कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोबाईल अॅडीक्ट लोकांना चांगलच सुनावलंय. विशेष म्हणजे कोल्हापुरच्या सभेत बोलताना चक्क आमचे जिल्हाध्यक्षच मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेत, आता कुणाला काय बोलायंच, असंही अजित पवार यांनी म्हटलं. कार्यकर्त्यांच्या मोबाईल वेडाबाबत बोलताना अजित पवारांचा पारा चांगलाच चढल्याचं पाहायला मिळालं.
सध्या नवी पिढी त्या मोबाईलमध्येच डोके घालून बसलेली असते. सतत बटणं दाबत बसलेले असतात, हे सर्व चुकीचं असून गरजेपुरताच मोबाईल वापरला पाहिजे. माझं भाषण सुरु असतानाच, बघा आता माझा जिल्ह्याअध्यक्ष मोबाईलमध्ये दंग आहेत. जिल्ह्याध्यक्षांएवढं काम मला नाही, मला त्यांच्यापेक्षा कमी काम आहे, असे म्हणत पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना चिमटा काढला. मीही मोबाईल वापरतो, आत्ताच मी जयंत पाटलांना फोन केला, धनंजय मुंडेंना फोन केला, त्यांच्याशी फोनवरुन बोललो. पण, सतत मोबाईलमध्ये डोकावणं बरं नाही, मोबाईलमध्ये सतत डोकावणं ही विकृती आहे. आपण एखाद्याच्या घरी गेलो तर सगळे फोनमध्येच बसलेले असतात. आलेल्या पाहुण्यांची विचारपुसही केली जात नाही, मग आपण काय वेडे म्हणून जातो का, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, ज्याचं-त्याचं डोकं मोबाईलमध्ये पाहून अजित पवारांनाही चांगलाच राग आल्याचं पाहायला मिळालं. वडिलधाऱ्यांप्रमाणेच अजित दादांना दादा बनून कार्यकर्त्यांच्या मोबाईल व्यसनावरुन खडसावलं. मोबाईल वेड आवरण्याचा सल्लाही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.