कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या दुचाकींची हवा अचानक निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व कर्मचाऱ्याकडून सोडण्यात आली. वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी त्यांच्याकडून थेट कारवाई झाल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. ज्यांच्या दुचाकींमधील हवा गेली, त्यांना त्या ढकलत नेण्याची वेळ आली.काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिथे रिकामी जागा दिसेल तिथे वाहने लावल्याचे चित्र होते. ही वाहनेही अस्ताव्यस्त पद्धतीने लावली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन हॉर्नचा कर्कश आवाज यायचा. यामुळे कार्यालयीन कामात व्यस्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास व्हायचा.
याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेला कळविल्यानंतर अनेक वेळा त्यांच्याकडून वाहने उचलून नेण्याची कारवाई करण्यात आली; परंतु काही दिवसांनंतर पुन्हा तेच अस्ताव्यस्त चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पार्किंगचे झोन करण्यात आले. यामध्ये चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांची वाहने यांच्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली. त्यानुसार वाहने पार्किंग करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली.
यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या ड्यूटी लावण्यात आली. त्यानंतर वाहनांच्या पार्किंगबाबत बऱ्यापैकी शिस्त लागली होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून ‘नो पार्किंग’मध्येच दुचाकी दिसू लागल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यानीच कानाडोळा केल्याने हे चित्र दिसू लागले. अचानक निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला सोबत घेऊन खिशातील किल्लीने थेट दुचाकींच्या हवा सोडायला सुरुवात केली.
अचानक झालेल्या या प्रकाराने वाहनधारकांची तारांबळ उडाली. ‘नो पार्किंग’चे फलक लावूनही वाहने लावल्याबद्दल हवा सोडण्याची थेट कारवाई निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यांच्या या कारवाईच्या धसक्याने वाहनधारक पार्किंगचे फलक पाहूनच वाहने लावत होते. तसेच ज्यांच्या दुचाकीची हवा गेली, त्यांना दुचाकी ढकलतच पायपीट करावी लागली.