कोल्हापूर : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिल्यानेच चंद्रदीप नरकेंनी दहा वर्षे आमदारकी भोगली, मात्र, कधीही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो किंवा शिवसेनेचा लोगो वापरला नाही. आमच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित करणारे नरके स्वार्थासाठी ‘गोकुळ’, जिल्हा बँक, साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, त्यावेळी त्यांचे नकली हिंदुत्व कोणत्या खुंटीला टांगले होते ? असा पलटवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व उपजिल्हा प्रमुख बाजीराव पाटील, महिला संघटक शुभांगी पोवार, तानाजी आंग्रे यांनी पत्रकातून केला.बाजीराव पाटील म्हणाले, चंद्रदीप नरके व त्यांचे काका २००९ ला ‘मातोश्री’च्या दारात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी गेले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी डोक्यावर हात ठेवला म्हणून नरके आमदार झाले. मात्र, २००९ पासून ते घरोघरी नववर्षाचे कॅलेंडर वाटप करत होते, त्याच्यासह स्वत:च्या गाडीवर कधी बाळासाहेबांचा फोटो किंवा शिवसेनेचा लोगो वापरला नाही. शिवसैनिक हा मातोश्रीचा आदेश पाळणारा आहे, त्याने तिन्ही निवडणुकीत नरकेंचे प्रामाणिकपणे काम केले.
मात्र, ज्यांनी नरकेंनी पदे देऊन मोठी केली, त्यांनीच २०१९ ला त्यांचा घात केला. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी करवीर मतदारसंघात जे काम केले, त्यामुळे आपण दोन वेळा आमदार झालात, हे विसरू नका. येथून पुढे जिल्हाप्रमुखांवर बगलबच्च्यांनी बोलताना जीभ सांभाळावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. आगामी २०२४ ला ‘मातोश्री’चा जो आदेश असेल तोच आमचा उमेदवार, जो ‘मातोश्री’चा घात करतो, तो राजकारणातून संपतो, हा शिवसेनेचा इतिहास कोणी विसरू नये, असा इशाराही बाजीराव पाटील यांनी पत्रकातून दिला.नरकेंनी करवीरमध्ये किती शाखा काढल्या ?चंद्रदीप नरके व पोपटपंची करणाऱ्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात गेल्या तेरा वर्षांत शिवसेनेच्या किती शाखा काढल्या, पक्षाची सभासद नोंदणी किती केली ? याचा हिशोब द्यावा, असे बाजीराव पाटील यांनी म्हटले आहे.शिवसैनिकांचा बळी देणाऱ्यांचे हिंदुत्व बेगडेकेवळ नरके गटाच्या बगलबच्च्यांची राजकीय बघणाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीसह इतर संस्थेत निष्ठावंत शिवसैनिकांचा बळी दिला. ते आम्हाला हिंदुत्व शिकवत असून, चंद्रदीप नरकेंचे हिंदुत्व बेगडे असल्याची टीका बाजीराव पाटील यांनी केली.