कोल्हापूर : रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या नावाखाली ‘आयआरबी’ने दिलेले २५ कोटी रुपये गेले कोठे? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री येथे बोलताना उपस्थित केला. या प्रकरणासह थेट पाईपलाईन योजनेची चिरफाड करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांचा कार्य अहवालाचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाले. महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे अध्यक्षस्थानी होते.
आमदार पाटील म्हणाले, भाजपचे सरकार सत्तेत असताना आम्ही कोल्हापूरला टोलमुक्त करताना ‘आयआरबी’चे सर्व पैसे भागविले. एक पैसाही महापालिकेकडे मागितला नाही. आज शहरातील सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अंतर्गत रस्त्यांसाठी ‘आयआरबी’ने दिलेले पैसे अन्य मार्गाने वळविले. ते कोठे गेले याची चिरफाड करावी लागणार आहे.
बिहार प्रयोग
गेल्या वेळी थोडक्यात सत्ता गेली. यावेळी भाजपची सायलेंट वेव्ह निर्माण करण्याची गरज आहे. जी चर्चेतून, संवादातून करता येते. कार्यकर्त्यांनी तसे प्रयत्न करावेत. हा प्रयोग बिहारमध्ये यशस्वी झाला. तो कोल्हापुरात करूया, बुकिंग दि व्होटर्स उपक्रम राबवावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
बिंदू चौकात येण्याचे आव्हान
आम्हाला ऊठसुट कोल्हापूरसाठी काय केले असे विचारले जाते. कोल्हापूरसाठी भाजपने काय केले आणि कॉग्रेस -राष्ट्रवादीच्या आमदार, खासदार, मंत्री यांनी काय केले याचा लेखाजोखा मांडण्यासाठी बिंदू चाैकात एका व्यासपीठावर यावे, असे आव्हान देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिले.
प्रारंभी अजित ठाणेकर यांनी प्रास्ताविकात महापालिकेतील भ्रष्टाचारात लुटले जाणारे अडीच कोटी रुपये वाचविल्याचे समाधान असल्याचे सांगितले. सत्ताधाऱ्यांनी सरकारच्या निधी वाटपावेळी आमच्या निधीला कात्री लावल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी भूषण गांधी यांना समिधा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हेमंत आराध्ये यांनी आभार मानले. डॉ. सूर्यराव वाघ, मुकुंद भावे, निवास साळोखे, एस. के. कुलकर्णी उपस्थित होते.
- फोटो पाठविला आहे.-