कवठेमहांकाळ : राज्यात केवळ एक दशांश सिंचन वाढले, मग सिंचन प्रकल्पांचे सत्तर हजार कोटी रुपये गेले कोठे? भ्रष्टाचार कोणी केला? सिंचन योजना पूर्ण का झाल्या नाहीत? अशी सवालांची सरबत्ती करत केंद्रीय परिवहन व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांच्या भाजपप्रवेशानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.घोरपडेंचा पक्षप्रवेश म्हणजे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपने दिलेला शह असल्याचे मानले जात आहे. या मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवताना गडकरी म्हणाले की, आज देशात साखरेला किंमत नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. देशातील शेतकरी इथेनॉल तयार करू शकतो, मग आधीच्या काँग्रेस सरकारने पेट्रोल-डिझेलवर इतके पैसे कशाला उधळले? ते शेतकऱ्यांना का दिले नाहीत? शेतकऱ्याचा ट्रॅक्टर त्यानेच तयार केलेल्या इथेनॉलवर चालला पाहिजे. आता आम्ही सांगलीकरांसाठी ग्रीन बस पाठवणार आहोत. ती शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी असेल.ते म्हणाले की, भाजपने जातीचे राजकारण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातीचे राजकारण आणि घराणेशाही मान्य नाही. शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या काँग्रेस सरकारने जातीचे राजकारण करून राज्याला खड्ड्यात घातले. सर्वांचा विकास हाच भाजपचा उद्देश आहे. युती शासनाच्या काळात मी मंत्री असताना चार हजार कोटींचे रोखे जनतेतून उभे केले आणि रस्ते बांधले. अठराशे कोटींचे उड्डाणपूल एक हजार कोटींत उभे करून आठशे कोटी वाचवले. कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली. आमच्यानंतर पंधरा वर्षांत राज्यात केवळ एक दशांश टक्के सिंचन वाढले, मग सिंचन प्रकल्पांचे सत्तर हजार कोटी रुपये गेले कोठे? भ्रष्टाचार कोणी केला? सिंचन योजना पूर्ण का झाल्या नाहीत? मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी त्याचे उत्तर द्यावे. या सरकारने राज्याला मागे नेले आहे. प्रधानमंत्री सिंचन योजना आम्ही हाती घेतली आहे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तर माझ्याकडेच आहे. रस्त्यावरील आरटीओंचे आणि पोलिसांचे ‘लक्ष्मीदर्शन’ बंद करणार आहोत. येथून पुढे कोणाचीही गाडी पोलीस अडवणार नाहीत, अशी व्यवस्था करू. पाण्याचा प्रश्न लगेच सुटणार नाही. काँग्रेसला पंचावन्न वर्षे संधी दिलीत, आम्हाला पाच वर्षे द्या. पाणीटंचाई दूर करू. पंधरा वर्षांची आघाडी सरकारची गाडी भंगारात विका, नाहीतर पाण्याचा थेंबही मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. आर. आर. पाटील म्हणजे मिठू-मिठू बोलणारा पोपट आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना पाच हजार रुपये वाया घालवू नयेत. कारण १५ आॅक्टोबरला महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त बनणार आहे, अशी टीका करत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केली. आघाडी शासनातील भ्रष्टाचार आणि या भागातील वीज व पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. प्रारंभी घोरपडे आणि डोंगरे यांचा भाजपप्रवेशाबद्दल गडकरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.आबांना आश्रम बांधून द्या! आर. आर. पाटील म्हणजे तर मिठू-मिठू बोलणारा पोपट! त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना पाच हजार रुपये वाया घालवू नयेत. संजयकाका, तुमच्या खासदार फंडातून आर. आर. आबांना एक आश्रम बांधून द्या, अशी मिश्कील टिप्पणी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी खा. संजय पाटील यांच्याकडे पाहत केली़
७० हजार कोटी गेले कोठे?
By admin | Published: September 14, 2014 12:01 AM