कोल्हापूर : जिल्ह्यात खतांची उपलब्धता मुबलक असल्याचे कृषी विभाग सांगत असले तरी शेतकऱ्यांना मात्र युरियाच्या पोत्यासाठी रानोरान फिरावे लागत आहे. उसाची भरणी आली आहे, आणि युरिया नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असताना कृषी विभाग कोणत्या आधारे खते भरपूर आहे म्हणून सांगते? मग युरिया नेमका विरगळला कोठे? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
सध्या उसाच्या लागणी व खोडव्यांच्या भरणीचे काम सुरू आहे. त्यासाठी युरियासह इतर खतांची शेतकऱ्यांना गरज आहे. युरियाने पिकांची वाढ जोमाने होतेच त्याचबरोबर पिकाला लवकर काळोखी येते. त्यात इतर खतांच्या तुलनेत परवडणारे असल्याने शेतकरी युरियाचा वापर करतात. मात्र गेली पंधरा दिवस जिल्ह्यात युरियाच नाही. कृषी विभागाचे अधिकारी मात्र जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. मग युरियाची टंचाई का आहे? हा खरा प्रश्न आहे.
याबाबत, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. सहकारी संस्थांपेक्षा खासगी विक्रेत्यांना खतांचा पुरवठा अधिक केला जातो, त्याचा परिणामही वितरणावर होत असल्याचा आरोपही केला. यावर जिल्हाधिकाºयांनी तातडीने संबंधित यंत्रणेकडे चौकशी करून युरियाचा पुरवठा करण्याचे आदेश दिले.
काळ्या बाजारात युरिया ३५० रुपयेआताच्या घडीला शेतक-यांच्या आवाक्यात असणारे खत युरिया आहे. त्याची कृत्रिम टंचाई दाखवून काळ्या बाजारात २६७ रुपयांचा युरिया ३५० रुपयांनी विक्री सुरू असल्याचा आरोप विक्रांत पाटील-किणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर केला.
कोल्हापूरला २६ टन युरिया मिळणारजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संबंधित यंत्रणेकडे विचारणा केली असता, येत्या दोन दिवसांत कोल्हापूरसाठी २६ टन युरिया उपलब्ध केला जाईल, असे सांगण्यात आले.