चंद्रकांत कित्तुरेगेल्या आठवड्यात एका नातेवाइकाच्या निधनानिमित्त तीनवेळा इचलकरंजीला जायचा योग आला. त्या नातेवाइकाचे घर इचलकरंजीतील चावरे गल्लीत आहे. २० वर्षांपूर्वी या गल्लीतून ट्रॅक्टर-ट्रॉली, रिक्षा, कार अशा वाहनांची ये-जा होत असे. मात्र, सध्या तेथे मोटारसायकल लावण्यासही जागा नाही अशी स्थिती आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहने याचा हा परिणाम आहे. पूर्वी गल्लीत एखाद-दुसरे चारचाकी वाहन, काही रिक्षा आणि मोजक्याच दुचाकी होत्या. आता प्रत्येकाच्या घरात दोन-तीन मोटारसायकली आहेतच.
दिवसा या मोटारसायकली कामानिमित्त बाहेर जात असल्या तरी रात्री त्या रस्त्यावरच लावल्या जातात. कारण गावभागातील जुनी गल्ली त्यामुळे घरेही छोटी आणि रस्ताही अरुंदच. गाड्या लावायला जागाच नाही. त्यामुळे सगळ््या गाड्या रस्त्यावरच. या गल्लीत सध्या एखादे चारचाकी वाहनही आत येऊ शकत नाही. रुग्ण, वृद्ध आणि अपंग यांना त्या गल्लीतील एखाद्या घरात जायचे असेल तर मोठी अडचण आहे.
रुग्ण असेल तर गल्लीतून बाहेरच्या रस्त्याला नेल्याशिवाय त्याला रुग्णवाहिकेत घालता येत नाही, अशी ‘भयानक’ परिस्थिती आहे. हे इचलकरंजीतील उदाहरण बहुतांशी शहरांमध्ये असलेल्या जुन्या गल्ल्यांमध्ये लागू पडते. कोल्हापुरातही तीच परिस्थिती आहे. पेठा असोत की उपनगरे रात्री रस्त्यावर वाहने पार्किंग केलेली असतात. अपवाद फक्त अपार्टमेंटस् किंवा मोठ्या बंगल्यांचा. बाजारपेठांतील रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्नदेखील गंभीरच आहे.
बऱ्याचवेळेला गाड्या कुठे लावायच्या हे बाहेर गावच्या वाहनचालकांना माहीत नसते. कोल्हापूरचा असला तरी दोन मिनिटांचे काम आहे म्हणून तो रस्त्यावरच वाहन लावून जातो. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. वाहतूक पोलीस अशा वाहनांवर कारवाई करतात, पण ते तरी कुठे-कुठे एकाचवेळी जाणार. शिवाय यावरून वाहतूक पोलीस आणि संबंधित वाहनचालक-मालक यांच्यात वादावादीचे प्रसंगही घडतात. शहरातील वाहनांची संख्या दररोज वाढतेच आहे. दुचाकी चालवणाºया अल्पवयीन मुलांच्या पालकांना दंड आणि शिक्षा करण्याच्या नियमाची अंमलबजावणी पोलिसांनी सध्या चालू केली आहे. दररोज अशा कारवाईच्या बातम्या येत आहेत. ही चांगली बाब आहे. मात्र, काही दिवस ही मोहीम राबवून थांबवू नये, अन्यथा पुन्हा पूर्वीसारखे ‘ये रे माझ्या मागल्या...’ चालू होते.
पार्किंगच्या प्रश्नावरही अशीच उपाययोजना करायला हवी. यासाठी ठिकठिकाणी वाहनतळांची सोय करणे गरजेचे आहे. कोल्हापूर हे पर्यटनस्थळ आहे. दररोज हजारो पर्यटक शहरात येत असतात. त्यांच्या वाहनांसाठी अंबाबाई मंदिराजवळील वाहनतळ सोडता अन्यत्र व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. बहुमजली पार्किंगतळाचा पर्यायही विचारात घेण्यासारखा आहे.
पुण्यात गेल्या आठवड्यात पे अँड पार्किंगचा विषय बराच गाजला. शहरातील सर्वच रस्त्यांवर दिवसा आणि रात्री वाहने लावल्यास शुल्क आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. हे समजताच पुणेकरातून प्रचंड विरोध झाला. विविध संघटनांनी महापालिकेच्या सभेवेळी महापालिकेला घेरावही घातला. अखेर महापालिकेने शहरातील केवळ पाच प्रमुख रस्त्यांवर २४ तास पे अँड पार्किंग केले आहे.
हे धोरण प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. विकसित राष्ट्रांत पार्किंगचा प्रश्न इतका गंभीर असल्याचे दिसत नाही. कारण तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्कृष्ट असते. शिवाय खासगी वाहने पार्किंग केल्यास आकारले जाणारे शुल्कही जास्त असते. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीसाठी शुल्क द्यायला प्रथम विरोध होतो. हे खरे असले तरी सोयी हव्या असतील तर शुल्क द्यावेच लागेल आणि त्यातूनच व्यवस्था उभी करता येऊ शकेल.