कोल्हापूर : गेल्या आठवडाभरातील छप्पर फाडके पडलेल्या पावसामुळे कोल्हापुरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहनधारकांना वाहने चालविताना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. या रस्त्यांवर महापालिकेने केलेला कोट्यवधीचा खर्च वाया गेल्यामुळे नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. खराब रस्त्यांचे पंचनामा करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.शहराच्या प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नीट वाहने चालविता येत नाहीत. त्यात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय वाहन दुरुस्तीसाठी होणारा खर्च परवडेनासाही झाला आहे.
अनेकांना कंबरदुखी व मणक्याचे आजार जडले आहेत. पावसात वाहून गेलेल्या या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे ज्या ठेकेदाराने काम केले आहे. अशा ठेकेदार व त्याची तपासणी केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. शहरातील अनेक रस्ते, चौकांमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून ते आणखी मोठे होऊ लागले आहेत.
विशेष म्हणजे या खड्ड्यांमध्ये वाहन गेल्यानंतर त्याची खोली वाहनधारकाला कळते. त्यामुळे अनेकदा वाहनधारकांचा तोल जाऊन पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील या रस्त्यांचे डांबरीकरण उन्हाळ्यापूर्वी केलेले आहे. त्यावरील डांबर कधीच निघून गेले आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्या ठेकेदारांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरातील खराब झालेले रस्ते असे
- शिवाजी चौक ते पापाची तिकटीकडे जाणारा रस्ता
- गंगावेश चौक ते दत्त महाराज मंदि
- रेगे तिकटी ते भाजी मंडई
- पापाची तिकटी ते महापालिका माळकर तिकटी चौक
- बाबूजमाल रोड ते जोतिबा रोड
- धोत्री गल्ली ते केएमसी कॉलेज
- भवानी मंडप कमान ते जेल रोड
- स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर ते वायल्डर मेमोरियल चर्च रस्ता
- सीपीआर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय चौक
- राजहंस प्रिटिंग प्रेससमोरील भाऊसिंगजी रोड, खरी कॉर्नर चौक
- शिवाजी पेठ, जुन्या बलभीम बँकेसमोरील रस्ता
- गंगावेश दूध कट्टा परिसर
- राजारामपुरी शिवाजी विद्यापीठ रोड, कोळेकर तिकटी ते जुनी शाहू बँक रस्ता.