देशात काँग्रेसचे अस्तित्व कोठे आहे?, राधाकृष्ण विखे-पाटलांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:29 AM2022-08-22T11:29:42+5:302022-08-22T11:30:09+5:30
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य अधोगतीला जात होते. राज्यातील जनतेला अपेक्षित असणारे सरकार सत्तेवर आले असून आम्ही जनतेच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करू.
कोल्हापूर : राज्य व देश पातळीवर काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कोठे आहे? गेल्या अडीच वर्षांत केवळ मंत्रिपदासाठीच राज्यात अस्वित्व होते. पक्षासाठी ना नेतेमंडळींना, ना पक्ष नेतृत्वाला स्वारस्य नाही, अशी बोचरी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली.
मंत्री विखे-पाटील हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री विखे-पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य अधोगतीला जात होते. राज्यातील जनतेला अपेक्षित असणारे सरकार सत्तेवर आले असून आम्ही जनतेच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करू. वाळू माफियांचा उन्माद ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. यातून गुन्हेगारी वाढलेली आहे. हे थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल. अवैध वाळू उपसामधून निर्माण झालेल्या अनैतिक थांबवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार गोष्टी आहे.
शिर्डीत पक्षाच्या निर्णयानुसार काम करू
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २०२४ ची निवडणूक लढविण्याची घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत मंत्री विखेपाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. त्यामुळे याबाबत पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार काम केले जाईल.