कोल्हापूर : कार टेप रिपेअरिंगच्या व्यवसायावरच घराचा डोलारा उभा केलेल्या उमेश बाबूराव शिंदे यांच्या शनिवारी (दि. १७) रात्री झालेल्या अपघाती मृत्यूमुळे शिंदे यांच्या मित्रपरिवाराला चांगलाच मोठा धक्का बसला आहे. घरातील कमावती व्यक्तीच नियतीने हिरावल्याने कुटुंबीयांच्या पायांखालची जमीनच सरकली आहे.क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे भाड्याच्या घरात राहणारे उमेश शिंदे यांचे शिवाजी स्टेडियम परिसरासमोर कार टेप रिपेअरिंगचे दुकान होते. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या उमेश यांनी अन्य ठिकाणी नोकरी करीत कार टेप रिपेअरिंगचे प्रशिक्षण घेतले. १३ वर्षांपूर्वी कार टेप रिपेअरिंगचे स्वत:चे दुकान सुरू केले.
कार टेप रिपेअरिंगमध्ये त्यांचा विशेष हातखंडा होता. त्यामुळे विविध ठिकाणांहून त्यांच्याकडे या कामासाठी ग्राहक येत होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. दिवसरात्र कष्टांमुळे घरची परिस्थिती जरा कुठे सुधारत होती.उमेश हे शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर पडले. दुकानात काम करून रात्री घरी येताना पार्वती टॉकीजजवळील पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकून घरी येत असताना त्यांचा उमा टॉकीजच्या चौकात महानगरपालिकेच्या कचरा उठाव करणाऱ्या डंपरच्या पाठीमागील चाकाखाली सापडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती त्यांचे मोठे भाऊ विजय शिंदे यांना कोणीतरी फोन करून सांगताच त्यांच्याही तोंडचे पाणीच पळाले.आपल्या काही नातेवाइकांसोबत ते घटनास्थळी आले. उमेश यांची स्थिती पाहून त्यांना मानसिक धक्काच बसला. ‘उमेश ठीक होईल ना?’ त्यांच्या या प्रश्नाने कुणाला काय बोलावे समजत नव्हते. नातेवाईक व मित्रमंडळींनी त्यांना धीर देत सावरले. उमेश यांच्या पश्चात आई, भाऊ, दोन मुली, पत्नी, तीन बहिणी असा परिवार आहे. दोन्ही मुली शिक्षण घेत आहेत. आता कुठे उमेशच्या आयुष्याची घडी बसत होती, तोवरच ही दुर्घटना घडल्याचे भाऊ सुहास ऊर्फ विजय शिंदे यांनी सांगितले.