कोल्हापूर : मी गेल्या पाच वर्षांत एक इंचही जमीन घेतलेली नाही की एक ग्रॅम सोने घेतले नाही; पण स्कूटरवरून फिरणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्याकडे खासगी साखर कारखाना काढण्याएवढा पैसा कुठून आला? फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्यासाठी बंटी पाटील यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला. एका भावाच्या बांधलेल्या आणि एकाचे बांधकाम सुरू असलेल्या बंगल्याच्या किमती किती, अशी विचारणा करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांवर तिखट शब्दांत हल्ला चढविला.
भाजपच्या कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे यांची सोमवारी निवड करण्यात आली. त्यावेळी बोलताना पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविणार असल्याचीही घोषणा केली.
पाटील म्हणाले, काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील एका नेत्यावर आयकरची धाड पडली. त्याचे अहवाल कुणी पाहिलेत. तुम्ही चोरून का असेना सत्तेवर आला आहात ना? तर जनतेची कामे करा ना. आम्ही काय केले किंवा नाही हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही कामे करा. दुसºयाकडे एक बोट करताना आपल्याकडे चार बोटे होतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही मला काय काम केले म्हणून विचारता ? टोल घालवला, नृसिंहवाडीसाठी १२१ कोटी रुपये आणले, अंबाबाई तीर्थक्षेत्रासाठी निधी आणला, विमानतळ सुरू केले, जिल्ह्यातील रस्ते केले. रात्री नंतर दिवस येतो हे लक्षात ठेवा नंतर तुम्हाला तोंडे लपविण्याची वेळ येईल.
आम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा जनादेश आहे, असे पवार सांगत होते आणि सत्तेत जाऊन बसले. त्यानंतर त्यांची बोटेच स्वर्गात गेली. काय करू, अन् काय नको; अशी त्यांची अवस्था झाली; पण तुम्ही कुणाला भीती दाखविता? असा सवाल उपस्थित केला.
ते म्हणाले, आम्ही एकच नेता मानला. एकच कार्यक्रम जाहीर केला; परंतु नंतर लाथ मारण्याचे काम शिवसेनेने केले आणि हे अनैतिक सरकार सत्तेवर आले. आम्ही अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना नेता मानतो; पण पवारांनी सांगितले म्हणून पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात नाहीत. त्यांनीच सांगितले म्हणून भास्कर जाधव यांना पद नाही. त्यांनीच सांगितले म्हणून तानाजी सावंत यांना पद नाही म्हणजेच शरद पवारांना आणि सोनिया गांधींना तुम्ही नेता मानले आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
- महाडिक, कोरे, आवाडेंचे कौतुक
कोल्हापूर जिल्हा परिषदेत आम्ही हरलो. कारण ज्यांनी याआधी पदे घेतली, कामे करून घेतली, आमच्या मांडीला मांडी लावून बसले. ते पळून गेले; पण ढासळत्या घरातही धनंजय महाडिक, विनय कोरे, प्रकाश आवाडे हे ठामपणे उभे राहिले त्यांचे मी जाहीर कौतुक करतो, असे, चंद्रकांत पाटील म्हणाले.
- गाडीचे टायर बदलण्याआधी सरकार बदलेल
आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची सवय आहे; कुणाला भीती दाखवता. भाजप सरकार पाडण्यासाठी काहीही करणार नाही; पण तुमच्या मरणानेच सरकार मरणार आहे. तुम्हाला दिलेल्या गाड्यांच्या टायर बदलायच्या आत लूटमार करून सत्तेत आलेले सरकार बदलेल, अशी जहरी टीका पाटील यांनी यावेळी केली.
- माध्यमांवरही टीका
पाटील यांच्या तडाख्यातून माध्यमेही सुटली नाहीत. ‘राज्यात सर्वांत जास्त भाजपचे जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊनही भाजप पराभूत’ असे कसे छापता, पवार आणि काँग्रेसला जे जमले नाही असे जादा संख्येने आमदार आम्ही आणले तरी भाजप पराभूत कसा ? अशी विचारणा त्यांनी केली.
- शिवसेना नावाचा भाऊ चोरून नेला
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘तुम्ही आमचा शिवसेना नावाचा ‘भाऊ’ चोरून नेला. त्यांना मुख्यमंत्रिपद आणि इतर पदांची आमिषे दाखविली. त्यांना फसवून नेलं. जड खाती राष्ट्रवादीने घेतली. आता जनतेची कामे करा.‘केएसबीपी’विरोधात खालच्या दर्जाचं राजकारण : केएसबीपी या संस्थेच्या माध्यमातून शहरात सुशोभीकरण केले. पोलीस उद्यान उभारले. ट्रॅफिकची माहिती दिली. या कामांची माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवता? कसले खालच्या पातळीचे राजकारण करता? मग त्यांना कुणी पैसे दिले असतील त्यांना धमक्या. एकतर आपण खिशातून पैसे काढायचे नाहीत आणि कुणी काम केलं तर त्याची चौकशी लावायची. मतांचा दर तेवढा यांना वाढवता येतो, असेही पाटील म्हणाले.