कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथे रंगकाम करुन घरी जात असताना पुणे-बंगलोर महामार्गावर रस्ता ओलांडताना भरधाव कारने धडक दिल्याने पेंटरचा जागीच दूर्देवी मृत्यू झाला. रमजान राजू इनामदार (वय १७, रा. सिध्देश्वर शाळेजवळ, विक्रमनगर) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे विक्रमनगर परिसरात शोककळा पसरली. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, आपला 17 वर्षीय तरुणा मुलगा काळाने हिरावल्यानंतर आईनं हंबरडा फोडला. माझं बाळ कुठंय हे आईचे शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले.
अधिक माहिती अशी, रमजान इनामदार याच्या घरची परिस्थिती बेताची होती. वडीलांचे दोन महिन्यापूर्वी छत्र हरवले होते. तो आणि आई असे दोघेच राहत होते. घरची सर्वस्वी जबाबदारी त्याचेवर होती. घरे रंगविण्याची कामे तो घेत असे. पेटींगमध्ये त्याचा हातखंडा होता. उचगाव येथे रंगकाम घेतले होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे जेवण करुन तो कामावर गेला. काम आवरुन घरी परतत असताना पुणे-बंगलोर महामार्गावर उचगाव येथील सुर्यदिप हॉटेलसमोर रस्ता ओलांडताना भरधाव कारने (एम. एच. ०९ सी. एम. ७०४८) त्याला जोराची धडक दिली. त्याच्या डोक्यासह हाता-पायाला गंभीर दूखापत होवून रक्ताच्या थारोळ्यात तो रस्त्यावर पडला. या मार्गावरील वाहनधारकांनी चालकाला सोबत घेत जखमी रमजानला त्याच कारमधून तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रमजानच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच विक्रमनगर परिसरातील दोनशे तरुणांचा जमाव सीपीआरमध्ये आला. मनाने स्वच्छ, कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभाव असलेल्या रमजानचा मृतदेह पाहून नातेवाईकांसह मित्रांनी हंबरडा फोडल्याने संपूर्ण सीपीआर परिसर शोकसागरात बुडाला. त्याच्या पश्चात आई आयेशा, बहिण निलोफर असा परिवार आहे. विक्रमनगर येथील नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी रमजानच्या आई व बहिणीला आधार देत त्याच्या अंत्यविधीची व्यवस्था केली. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.
माझ बाळ कुठे हाय....
रमजान हा लहान वयातच कामावर जात होता. त्याचा आईला मोठा आधार होता. एकुलता असल्याने आईचा त्याचेवर जिव होता. आपला पोटचा गोळा कायमाचा निघून गेल्याने आई आयेशा कावऱ्या-बावऱ्या झाल्या होत्या. त्यांना मानसिक धक्का जोरात बसला होता. सीपीआरच्या आवारात त्या टाचा घासत ओक्साबोक्सी आक्रोश करीत होत्या. माझं बाळ कुठे हाय, मला बघायचं आहे, त्यांची ही केविलवाणी अवस्था पाहून अनेकांचे डोळे भरुन आले.