विजयसिंग पाटील
मार्केट यार्ड : ताराराणी चौक ते टोलनाका हा मार्ग तसा प्रचंड रहदारीचा. या मार्गावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथची सोय केली खरी; मात्र हेच फूटपाथ आता गायब झाल्याचे चित्र आहे. फेरीवाले, फळविक्रेते, तसेच इतर व्यावसायिकांनी या मार्गावरील फूटपाथवर अतिक्रमण करून आपले बस्तान बसविल्याने पादचाऱ्यांना नाइलाजास्तव मुख्य मार्गावरूनच चालत जावे लागत आहे. मुख्य मार्गावरून वाहने सुसाट धावत असल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे फूटपाथ असूनही मुख्य मार्गाचा धोका का पत्करायचा असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहरात प्रवेश करणारा हा मुख्य रस्ता असल्याने ताराराणी चौक ते टोलनाका मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावरून पायी जाणारे फूटपाथचा सुरक्षित मार्ग निवडतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे फूटपाथच अतिक्रमणामुळे गिळंकृत केले आहेत. अनेकांनी या फूटपाथवर छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत, तर काहीजण यावर गाड्या पार्किंग करीत असल्याने पादचाऱ्यांना या फूटपाथचा वापरच करता येत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच मार्ग काढावा लागतो. विशेष म्हणजे अतिक्रमण विभागानेही याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने फूटपाथवरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. अतिक्रमण विभागाने या मार्गावरील अतिक्रमण काढून फूटपाथ नागरिकांसाठी खुले करावेत, अशी मागणी होत आहे.
चौकट : झाकणे गायब : या मार्गावरील फूटपाथवरील झाकणे गायब झाली आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना यावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. प्रशासनाने ही झाकणे त्वरित बसविणे गरजेचे आहे.
कोट :
शहरातील मुख्य प्रवेशद्वारावर असणाऱ्या या मार्गावरील पादचारी मार्गांची दयनीय अवस्था शोभनीय नाही. फूटपाथवरील अतिक्रमण व अनेक ठिकाणची झाकणे बेपत्ता झाल्यामुळे फूटपाथवरून प्रवास करणे धोक्याचे आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मोहन खाडे, ज्येष्ठ नागरिक,
निवृत्त अधिकारी.