लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची या पंचवार्षिकमधील शेवटची सभा शुक्रवारी झाली. यामध्ये सर्वच संचालकांचा सत्कार करण्यात आला; मात्र गेली ४६ वर्षे ‘गोकूळ’मध्ये काम करणारे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांना निरोप देताना सभागृह गहिवरले.
अरुण नरके म्हणाले, राजकीय जीवनाची सुरुवात सगळीच करतात; मात्र कुठे थांबायचे हे ज्याला कळते, तोच जीवनात यशस्वी होतो, त्यामुळेच आपण थांबत आहोत. निवृत्तीनंतरही दूध उत्पादकांसाठी काम करू.
कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर म्हणाले, राज्यात सहकारी अवस्था बिकट असताना ‘गोकूळ’ दीपस्तंभासारखा उभा आहे. डॉॅ. वर्गीस कुरीयन यांच्या स्वप्नातील दूध व्यवसाय ‘गोकूळ’ने साकारला असून त्याचे खरे श्रेय संचालक, दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांना आहे.
आनंदराव पाटील- चुयेकर यांनी लावलेल्या या रोपट्याचे डेरेदार वृक्षामध्ये रूपांतर करण्याचे काम अरुण नरके यांच्या कुशाग्र बुद्धी व दूर दृष्टीतून झाल्याचे सांगताना रणजीतसिंह पाटील हे भावुक झाले. सेवानिवृत्तीबद्दल विजय दरेकर, सदाशिव पाटील, विलास चौगुले, रंगराव बोडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक, अधिकारी उपस्थित होते.
राजकीय वक्रदृष्टीपासून ‘गोकूळ’ वाचवा
‘गोकूळ’चे कामकाज राजकारण विरहित केल्यानेच संघाला १४ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या ‘गोकूळ’कडे काही राजकीय वक्रदृष्टी झाली असून त्यापासून वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी केले.
फोटो ओळी :
‘गोकूळ’मध्ये शुक्रवारी संचालक मंडळाची या पंचवार्षिकमधील अखेरची सभा झाली. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विलास कांबळे, बाबा देसाई, विश्वास जाधव, अध्यक्ष रवींद्र आपटे, अरुण नरके, रणजीतसिंह पाटील, दीपक पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१६०४२०२१-कोल-गोकूळ)