जयसिंगपूर : वारसा नोंदी करण्याच्या कामासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना आज, शनिवारी जयसिंगपूर येथील नगर भूमापक कार्यालयाचे (सिटी) परीक्षण भूमापक गोविंद सुभाष बेलवलकर (वय ४१, रा. फ्लॅट क्र. १०, रुणवाल टॉवर, जयसिंगपूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दुपारी सव्वाच्या सुमारास ही कारवाई केली. शहानवाज बालेचॉँद मणेर (रा. डेबॉन्स कॉर्नर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.मिळकतीवर वारसनोंद करण्यासाठी शहानवाज मणेर यांनी २००९ साली येथील भूमापक कार्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज मिळत नसल्याने भूमापक बेलवकर यांनी पंधरा दिवसांपूर्वी नव्याने अर्ज घेतला होता. अर्जासोबत पाचशे रुपये घेतले होते. वडिलोपार्जित मिळकतीवर मणेर यांच्यासह भाऊ व दोन बहिणी अशी नावे नोंदविण्याबाबतचा उल्लेख अर्जात करण्यात आला होता. शुक्रवारी (दि. २०) याबाबत पुन्हा मणेर कार्यालयात गेले होते. यावेळी बेलवलकर यांनी पुन्हा पाचशे रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर मणेर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर या विभागाने सापळा रचला. आज दुपारी सव्वाच्या सुमारास मणेर यांच्याकडून पाचशे रुपयांची नोट घेताना बेलवलकर याला कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर येथील पोलीस ठाण्यात त्याची दिवसभर चौकशी सुरू होती.पोलीस उपअधीक्षक पद्मावती कदम, मनोज खोत, संदीप पावलेकर आदींनी कारवाईत भाग घेतला. (प्रतिनिधी)
पाचशेची लाच घेताना परीक्षण भूमापकास अटक
By admin | Published: June 22, 2014 12:37 AM