कोल्हापूर : पहाटेपासून दाट धुके, त्यानंतर ढगाळ वातावरण आणि त्यात बोचरे थंड वारे अशी सुरुवात झाली. अंगाला बोचणाऱ्या थंड वाऱ्यामुळे दिवसभर अंगातील हुडहुडी गेली नाही. उत्तर भारतात तापमानात घट होऊन अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. येत्या चार दिवसांत कोल्हापुरातील तापमानात आणखी घट होणार असून, किमान तापमान ११ डिग्रीपर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहिल्यानंतर तीन-चार दिवस हवामान कोरडे राहिले; पण सकाळी हवामानात एकदम बदल झाला. गेले दोन दिवस थंडगार वारे वाहत होते. सकाळी त्यात वाढ झाली. पहाटे दाट धुके आणि अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरली. आकाशात ढग दाटून आल्याने पाऊस सुरू होतो की काय, असे वातावरण राहिले. सकाळी दहापर्यंत ढगाळ वातावरण राहिले; पण दिवसभर गार वारे वाहत राहिल्याने अंगातून थंडी जात नव्हती.उत्तरेकडे वातावरणात बदल झाला असून तिथे अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे वाहत असून त्याचा परिणाम येथे जाणवत आहे. विदर्भ, गोव्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
कोल्हापुरात मात्र तापमानात घट होऊ तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. रविवारी कोल्हापूरचे किमान तापमान १६, तर कमाल २८ डिग्रीपर्यंत राहिले. पुढील चार दिवसांत किमान तापमानात घट राहणार असून, ते ११ डिग्रीपर्यंत खाली येऊन थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.ढगाळ वातावरणाचा फटका वेलवर्गीय दोडका, काकडी, द्राक्षे या पिकांसह टोमॅटो, वांगी, कोबी या पिकांना बसत आहे. किडींचा प्रादुर्भाव जाणवत असून अवकाळी पावसाची शक्यता असल्याने वीट व्यावसायिक, गुऱ्हाळमालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
येत्या चार दिवस असे राहणार तापमान डिग्रीमध्ये वार किमान कमालसोमवार १४ २७मंगळवार १३ २७बुधवार ११ २९गुरुवार १५ ३०शुक्रवार १६ ३२