तसे ते गोरगरीब, अनाथांचे श्रावणबाळ. राज्यातील गरीब रुग्णांना पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील नावाजलेल्या रुग्णालयातून मोफत औषधोपचार करण्याच्या कायद्याची अंमलबजावणी केली. आतापर्यंत हजारो, लाखो रुग्णांना त्यांनी विविध आजारांतून बरं केलं. त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नक्कीच आहे. गरीब जनतेला न्याय देण्यासाठीच जणू त्यांचा जन्म झालेला असावा. अशा या श्रावणबाळाची शुक्रवारी पत्रकार परिषद झाली. पत्रकारांनी त्यांना कोविड सेंटरमधील निराधार मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत विचारले. तेव्हा शेजारीच बसलेल्या अधिकाऱ्याने माहिती देण्यास सुरुवात केली. गुन्हा दाखल झालाय, अटक झालीय वगैरे वगैरे... तेव्हा नुसता गुन्हा दाखल करू नका निरापराध्याला फाशी द्या, अशी सूचना केली. अपराध्याला फाशी द्या असं म्हणायचं सोडून चुकून निरापराध्याला असा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडला. झालेली चूक नजरेस आणून दिली. तेव्हा महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे श्रावणबाळाने मोठ्या हिमतीने माफी मागितली. ‘चुकून निरापराध्याला म्हणालो. मी आपली माफी मागतो’, असे सांगून त्यांनी क्षणात चुकीची दुरुस्ती केली.
- भारत चव्हाण