कोल्हापूर शहरातून हाकेच्या अंतरावर वसलेल्या एका खेड्यात सध्या बेंगलोरस्थित कंपनीच्या साखळी पद्धतीतच्या स्कीमची जोरदार हवा सुरू आहे. पैशांची मोठाली स्वप्ने दाखविली गेल्याने घरटी एकतर व्यक्ती विशेषत : महिला वर्ग या स्कीमशी मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे. १ जुलैला ही स्कीम लाँच होणार असल्याने सहभागी सभासदांना ऑनलाईन ट्रेनिंग दिले जात आहे. मात्र ट्रेनिंगची वेळ सायंकाळी आठ ते ९ अशी एक तास ठेवल्याने बहुतांश घरातील महिलांनी कुटुंबातील सदस्यांना सातच्या आत जेवण करा अन्यथा नऊनंतरच जेवण मिळेल, असा नवा नियम लागू केल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात स्कीम लाँच झाल्यानंतर दिवसभरातला अर्धा वेळ सभासदांना ऑनलाईनवर द्यावा लागणार असल्याची माहिती कुटुंबातील एका सदस्याला मिळाल्यानंतर त्याने आपल्या घरात स्कीम नको, त्यापेक्षा गावात खानावळच सुरू करूया, ती जास्त चालेल असे म्हणताच एकच हशा पिकला.
कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:16 AM