कामात गुणवत्ता असेल तर ज्या-त्यावेळी त्या व्यक्तीला त्याचा योग्य तो मोबदला मिळतोच. पण काहींची गुणवत्ता नेहमीच कर्तृत्ववान राहिली, त्याचा ‘रिमार्क’ही वरिष्ठांकडून मिळाला, पण नशिबी कधीही योग्य तो मोबदला मिळालाच नाही. मिळाले फक्त तोंडभरून कौतुकच. साहेबांनी, सारा दक्षिण महाराष्ट्र सेवेच्या निमित्ताने पादाक्रांत करताना कर्तृत्वाचा ‘ए प्लस’ या उच्चश्रेणीचा आलेख घसरू दिला नाही. पण त्यांच्या मनात नेहमीच ‘ए प्लस’ची सल कायम राहिली. ‘आता सेवेतील मोजकेच राहिलेत दिवस’ असेही त्यांनी सहकाऱ्यांना बोलून दाखविले. अन् सेवेच्या अखेरच्या काही महिन्यांसाठी का होईन त्यांंच्या नशिबाच्या ‘लॉटरी’ने दरवाजा खटखटला. वरिष्ठांनी त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी दिली अन त्या खुर्चीवर ते विराजमान झाले. प्रदीर्घ प्रतीक्षेच्या कालखंडानंतर ते पद मिळाल्याने साहेब भावनिक झाले, पद हाती मिळाल्याने त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना, पण अखेर ‘ए प्लस’चे सार्थक झाले.
- तानाजी पोवार, कोल्हापूर