लहानपणी लाकूडतोड्याची गोष्ट ऐकली. त्यात विहिरीत पडलेल्या कुऱ्हाडीची कथा आपल्या चांगलीच स्मरणात राहिली. तसाच काहीसा प्रकार तळ्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘करवीर’काशीत घडली. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार कुऱ्हाडीची जागा बंदुकीने घेतली. ‘करवीर’मधील कळंबा तलावाच्या काठी नुकताच हा प्रकार घडला अन् उडालेला भडका शमविण्यासाठी धावाधाव करणाऱ्या आघाडीच्या पोलीस शाखेने देवरूपाची भूमिका बजावत, गायब झालेली बंदूक शोधण्याचा पराक्रम गाजविला ! ज्याप्रमाणे कथेतील लाकूडतोड्याने प्रामाणिकपणा दाखवत ‘ही कुऱ्हाड माझी नाहीच’ म्हणून सांगितले होते; पण खऱ्या घटनेतील संशयिताने ‘हीच ती बंदूक’ म्हणून ‘अ’प्रामाणिकपणाने मान डोलावली; कदाचित डोलवायला लावली. नंतर तीन दिवसांनी ‘करवीर’ने शोधखणीतून दुसरी बंदूकही बाहेर काढली. आता साऱ्यांना प्रश्न पडलाय, घटना एक, तर बंदुका दोन कशा? मग पहिली बंदूक कुठली? आता बार उडवणाऱ्यानेच प्रामाणिकपणा दाखवला नाही तर दोन्हीही बंदुका घटनेत दिसतील. उद्या कदाचित तिसरीही बंदूक येईल...!!
- तानाजी पोवार, कोल्हापूर.