विधान परिषदेची निवडणूक कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांना वगळूनच आता होणार आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी त्यासंबंधीचे वृत्त दिल्यावर सकाळी-सकाळी एका चौकस कार्यकर्त्याचा फोन आला. त्यांचे मत असे : महापालिकेला बाजूला करून मतदान झाल्यावर आमच्या नगरसेवकांचे प्रत्येकी किमान दहा-दहा लाख रुपये तरी बुडाले की हो.. अरेरे हे काही चांगलं झालं नाही. मग या निवडणुकीचा काय उपेग..?
लक्ष्यावर डोळा...
विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सध्या मतदार असलेल्या सर्वांचेच जास्त लक्ष आहे. निवडणूक कधी होणार आणि उमदेवार कोण असतील याबद्दल ते बारकाईने माहिती घेत आहेत. चंदगडमधून काल एका म्होरक्या कार्यकर्त्याचा असाच फोन आला. त्यानेही हीच चौकशी केली. त्याचे कारणही तसेच आहे. उमेदवार तगडे असतील आणि लढत चुरशीची झाली तरच आपलाही ‘भाव’ वाढणार आहे हे त्यांनी जाणले आहे. अनेकांची घराचे बांधकाम, पोराला गाडी, पोरीचे लग्न अशी अनेक कामे या लढतीवर अवलंबून आहेत राव...