कोल्हापूर : महाड दुर्घटनेत मदतकार्याची कौतुकास्पद कामगिरी बजावल्यानंतर कोल्हापूरात येऊन पुन्हा कोवीड सेंटरवर अन्नछात्रसाठी सेवा बजावण्यास निघालेल्या व्हाईट आर्मीच्या जवानावर संभाजीनगर वारेवसाहत परिसरात मद्यपी गुंडांनी हल्ला केला. प्रेम पितांबर सातपुते (वय २१ रा. कळंबा) असे त्याचे नाव आहे. डोक्यात दगड घातल्याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
महाड दुर्घटनेतील मदत कार्यात मोलाची कामगिरी बजावलेले प्रेम सातपुते हे व्हाईट आर्मीचे जवान पथकांसोबत बुधवारी रात्रीच कोल्हापूरात परतले. शिवाजी चौकात त्यांचा सत्कारही झाला. त्यानंतर ते घरी परतले. त्यानंतर सातपुते हे वारेवसाहतच्या पिछाडीस असणार्या कोवीडच्या अन्नछात्र सेंटवर झोपण्यासाठी दुचाकीवरुन जात होते. रात्री साडेबाराच्या सुमारास वारे वसाहतनजीक रस्त्याकडेला बसलेल्या मद्यपी गुंडांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला.
एकाने त्यांना धक्काबुक्की केल्याने सातपुतेंनी रस्त्याकडेला दुचाकी थांबण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठीमागून चार-पाच गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला व डोक्यात दगड घातला. हल्ल्यात सातपुते ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरीकांनी त्यांना गुंडांच्या तावडीतून सोडवले.
त्यांनी हल्ल्याची माहिती आपल्या इतर जवानांना दिली. काही क्षणातच व्हाईट आर्मीच्या रुग्णवाहिकेतून त्याला रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी सावित्रीबाई फुले रुग्णालयात दाखल केले, तेथे प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी लाईन बाजार येथील सेवा रुग्णालयात दाखल केले. याबाबत जुना राजवाडा पोलीसात अज्ञात चार-पाच जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
गुुंडांची अनेक दुचाकीस्वारांना मारहाण
वारे वसाहतनजीक रात्रीच्यावेळी रस्त्याकडेला महिला एकत्रीत गौरी गाण्यांनी खेळत असताना हे गुंडांचे टोळके शेजारीत घोळका करुन रस्त्यावरुन येणार्या-जाणार्या अनेक वाहनधारकांना मारहाण करत होते. यापुर्वीही या गुंडांकडून रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अगर पायी जाणार्यांना मारहाणीच्या घटना घडल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
पोलीस अधीक्षकांचे कारवाईचे आदेश
घटना घडल्याची माहिती मिळताच तातडीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिवन देशमुख यानी या हल्ला करणार्या गुंडांना शोधण्याचे आदेश जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पो. नि. प्रमोद जाधव यांना दिले. त्यामुळे पोलीस या हल्लेखोराचा शोध घेत आहेत