संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरोळ : शिरोळ विधानसभेच्या आखाड्यात आघाडी, युती होवो न होवो, मल्ल हे ठरले असून, कोणाचे डावपेच भारी ठरतात यावरच आमदारकीच्या कुस्तीचा निकाल निश्चित होणार आहे. शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे नेतेडॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, काँग्रेसचे गणपतराव पाटील, भाजपचे अनिल यादव व वंचित आघाडीकडून सुनील खोत यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.बावन्न गावे आणि तीन शहरे असा विस्तार असलेल्या शिरोळ तालुक्यामध्ये शिवसेनेसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे. गत विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसकडून डॉ. सा. रे. पाटील, राष्ट्रवादीकडून डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वाभिमानीकडून सावकार मादनाईक, तर स्वाभिमानीकडून फारकत घेतलेले उल्हास पाटील यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली. इतिहासात प्रथमच शिरोळमध्ये शिवसेनेचा उमेदवार २० हजार ३३ इतक्या मतांनी विजयी झाला. या निकालाच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना घरच्या मैदानावर धक्का बसला होता. आमदार म्हणून निवडून आलेले उल्हास पाटील यांच्या यशात गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीतील नेत्यांनी एकीने काम केले. गेल्या पाच वर्षांत आमदार पाटील यांनी निधी खेचून आणून विकासकामे केली. याचबरोबर जनसंपर्कही वाढविला.सन २०१४ च्या विधानसभेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी भाजपने राजकीय भूकंप घडविल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीतील प्रमुख नेतेमंडळी भाजपमध्ये दाखल झाली. यामध्ये अनिल यादव, डॉ. अशोकराव माने, धनाजी जगदाळे, विजय भोजे, रामचंद्र डांगे, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर या नेत्यांचा समावेश होता. जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचेच वर्चस्व राहिले.लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेससह स्वाभिमानीने एकत्र निवडणूक लढविली. यामध्ये नगराध्यक्षपदासह सत्ताही मिळविली. या निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढली होती, तर आमदार उल्हास पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभा केले होते. मात्र, त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. शिवसेना-भाजप एकत्र लढली असती तर शिरोळ पालिकेत वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते.दोन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस व स्वाभिमानी एकत्र असतानाही काटावरचे बहुमत तालुक्यातून शेट्टी यांना मिळाले. या निकालानंतर शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे; पण विधानसभा आणि लोकसभेचे रागरंग वेगवेगळे असतात.लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला शिरोळ तालुक्यातून २७ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी देखील वंचित आघाडीने तयारी सुरू केली आहे. लोकसभेप्रमाणेच दोन्ही काँग्रेस व स्वाभिमानी एकत्र येण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. शिरोळ हे स्वाभिमानीचे होमपिच असल्यामुळे ही जागा स्वाभिमानीला देखील देण्याबाबत एकमत होऊ शकते. परंतु गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत त्यांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे यड्रावकर निवडणूक लढणार हे निश्चित असून, अपक्ष अथवा अन्य आघाडी हा देखील पर्याय त्यांच्यासमोर असू शकतो. स्व. सा. रे. पाटील यांच्यानंतर काँग्रेसचे गणपतराव पाटील यांच्याबद्दलही तालुक्यात सहानुभूती असून त्यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. लोकसभेच्या निकालानंतर राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. शेट्टी जर विधानसभेच्या मैदानात उतरले तर तालुक्यातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे. शेट्टी जर निवडणुकीत उतरणार नसतील तर तालुक्यातील जातीय समीकरणामुळे स्वाभिमानीकडून मराठा कार्डदेखील पुढे आणले जाऊ शकते. स्वाभिमानीने दत्त कारखाना निवडणुकीत गणपतराव पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिरोळ विधानसभेची जागा स्वाभिमानीला मिळाल्यास गणपतराव पाटील यांचे बळ स्वाभिमानीला फायदेशीर ठरू शकते. भाजपने ‘गोकुळ’चे संचालक अनिल यादव यांना पुढे केले असले तरी माधवराव घाटगे यांच्याकडे भाजपची सूत्रे आली आहेत. बहुजन आघाडीची ताकद पाठीशी राहिल्यामुळे गत निवडणुकीत उल्हास पाटील आमदार झाले. त्यांचा विजय हा धक्कादायक होता. मात्र, शिवसेना-भाजपची वरिष्ठ पातळीवर युती ठरल्यामुळे उल्हास पाटील हेच पुन्हा विधानसभेचे उमेदवार असणार आहेत. गत निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. भाजपचा पाठिंबा स्वाभिमानीला होता. दरम्यान, येणाºया विधानसभा निवडणुकीत जातीचे आणि मतांचे गणित साधणारा उमेदवारच यशस्वी ठरणार हे मात्र निश्चित.उमेदवारीचा तिढा कायमशिरोळ विधानसभेची जागा राष्ट्रवादीला मिळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसनेही या जागेवर दावा केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही या जागेवर आग्रह आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेस व स्वाभिमानीची वरिष्ठ पातळीवर आघाडी झाल्यास शिरोळची जागा कुणाच्या पदरात पडणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
‘शिरोळ’मध्ये जातीचा, मतांचा कोण साधणार मेळ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:48 AM