सदाशिव मोरे
आजरा : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी आजरा तालुक्यात राजकीय धुमशान सुरू झाले आहे. १९८७ पासून सहावेळा‘गोकुळ’वर निवडून आलेले रवींद्र आपटे संचालक ते विद्यमान अध्यक्ष व ‘महानंदा’चे उपाध्यक्षही झाले आहेत. सर्व निवडणुकांना वेगवेगळ्या पक्षांच्या जाजमावर बसणारी नेतेमंडळी गोकुळसाठी आपटे यांच्या पाठीशी असतात हा इतिहास आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या आखाड्यात रवींद्र आपटे यांच्याविरोधात कोण शड्डू मारणार ? याबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.
आजरा तालुक्यात गोकुळसाठी २३३ ठरावधारक मतदार आहेत. यापूर्वी रवींद्र आपटे यांचेविरोधात शिवपुत्रअण्णा शेणगावे, वसंतराव धुरे, उदयराज पवार, अंजना रेडेकर यांनी नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. गेल्यावेळच्या निवडणुकीत रेडेकर यांचा २५० मतांनी पराभव झाला आहे. चालू वेळेला दूधसंस्थांचे ठराव करण्यापासून सर्वच नेतेमंडळींनी पुढाकार घेतलेला आहे. पण, विरोधी आघाडीतील उमेदवारी कोणाला? हा विषय सध्या तालुक्यात चर्चेचा आहे.
‘गोकुळ’साठी विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांची सत्तारूढ गटातून उमेदवारी निश्चित आहे. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी तालुक्याला दोन जागा देऊन आपल्याला संधी मिळावी अशी मागणी केली आहे. तर विरोधी गटातून काँग्रेसकडून रेडेकर, अभिषेक शिंपी, तर राष्ट्रवादीकडून वसंत धुरे, मुकुंद देसाई हे इच्छुक आहेत. अद्यापही विरोधी पॅनेलची रचना व उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू आहे.
गेल्यावेळच्या निवडणुकीत २१५ ठरावधारक मतदार होते. आता त्यामध्ये १८ ने वाढ होऊन २३३ झाली आहे. आजपर्यंत रवींद्र आपटे यांनी दूध वाढीसाठी वासरू संगोपन, संस्थांच्या इमारती, मिल्कोटेस्टर, संगणकीकृत दूध संस्था व दूध उत्पादक सभासदांना ‘गोकुळ’च्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
तालुक्यातील सर्वच संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्षांचे नेते आपल्या राजकीय सोयीनुसार पालखीचे भोई होतात. पण,‘गोकुळ’च्या निवडणुकीत आपटे यांच्या पाठीशी राहतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे.‘गोकुळ’ पाठोपाठ जिल्हा बँक, साखर कारखाना, तालुका संघ यासह गावपातळीवरील सेवा संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
- ‘गोकुळ’च्या ठरावधारकांत आपटेंचे वर्चस्व
तालुक्यातील २३३ पैकी बहुतांश ठरावधारक आपटे यांचे निष्ठावंत आहेत. ‘गोकुळ’मधील तज्ज्ञ व अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे त्यांचा जिल्ह्यातील दूध उत्पादकांशी जवळचा संपर्क आहे. बहुतांशी ठरावधारकांची नावे आपटे यांच्या सांगण्यानुसारच निश्चित झाली आहेत. त्यामुळे सातव्यांदा विजयासाठी आपटे यांनी ठरावधारकांत वर्चस्व मिळविले आहे. ----
* रवींद्र आपटे : १५०३२०२१-गड-०३
* अंजना रेडेकर : १५०३२०२१-गड-०४
* वसंतराव धुरे : १५०३२०२१-गड-०५
* अभिषेक शिंपी : १५०३२०२१-गड-०६