भारत चव्हाण-- कोल्हापूर -गतवर्षी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाषेवर प्रभुत्व असलेले, अभ्यासू, शहराच्या प्रश्नांची जाणीव असलेल नगरसेवक निवडून आल्यानंतर विकासाच्या दृष्टीने चांगली कामे होतील, अशी अपेक्षा बाळगलेल्या कोल्हापूरकरांचा अपेक्षाभंग होतो की काय, अशी परिस्थिती वर्षभरातच निर्माण झाली आहे. ज्यांना तज्ज्ञ, स्वीकृत म्हणून निवडले, तेच आता सभागृहात ‘गोंधळी’, ‘भांडखोर’ नगरसेवकांची भूमिका बजावत असल्याने महानगरपालिकेच्या सभागृहाची प्रतिष्ठा टांगणीला लागली आहे. यावेळच्या सभागृहात खरोखरच काहीतरी नवीन करण्याची उमेद असलेले अभ्यासू नगरसेवक निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे रोखठोक बोलणाऱ्या, अधिकाऱ्यांना धाडसाने प्रश्न विचारणाऱ्या, कायद्याची माहिती असणाऱ्या आणि एखाद्या विषयाचा अभ्यासपूर्ण कीस पाडणाऱ्या नगरसेविका निवडून आलेल्या आहेत. या नगरसेविकांचा गेल्या दहा महिन्यांतील सभागृहाच्या कामकाजातील सहभाग विशेष कौतुकास्पद ठरला आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवून पालिकेचा कारभार लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा कोल्हापूरकरांनी बाळगली होती; परंतु या अपेक्षेला गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तडे जायला लागले आहेत. मंगळवारी (दि. २७) झालेली सर्वसाधारण सभा तर भविष्यात काय घडणार आहे, याची छोटीशी झलक दाखविणारी होती. पालिकेची निवडणूक होऊन आता दहा-अकरा महिने होत आले. पक्षीय पातळीवर निवडणूक झाल्यामुळे तर कमालीची चुरस होती. त्यातून मग राजकीय अभिनिवेश, नेत्यांचा राजकीय संघर्ष, वैयक्तिक कुरघोड्या झाल्या. नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर हे सगळे विसरणे अपेक्षित होते; परंतु निवडून आलेले सर्वच नगरसेवक अद्याप या राजकारणाला चिकटून राहिले आहेत. ना नेत्यांनी त्यांना हे विसरायला लावले, ना कारभारी नगरसेवकांनी! त्यामुळे सभागृहात सर्वांनी मिळून काम करायचे असते, हे सगळेच विसरलेले आहेत. अजूनही योग्य असो की अयोग्य हे न पाहता एकाने बाजू घेतली की दुसऱ्याने विरोध करायचा एवढेच त्यांना सांगण्यात आले आहे. ताराराणी आघाडीच्या सुनील कदम यांनी एक मुद्दा मांडला की त्याला कॉँग्रेसवाल्यांनी विरोध करायचा, असे सभागृहात होताना पाहायला मिळत आहे. पक्षीय राजकारण नसताना पूर्वी आघाड्या, गटातटांचे राजकारण महापालिकेत होते. चार-पाच गट असायचे. निवडणुकीनंतर हे सर्व नगरसेवक एकत्र काम करीत असत. कोणत्या विषयावर किती चर्चा करायची, कोणता विषय मंजूर-नामंजूर करायचा, पुढील बैठकीकरिता घ्यायचा हे आधी ठरलेले असायचे. त्यामुळे सभागृहात कामकाजावेळी केवळ पक्षप्रतोद (सभागृह नेता) महापौरांना खालून सूचना करीत असत आणि त्याप्रमाणे कामकाज चालत असे; पण अलीकडे आघाडीच्या बैठकीत ठरलेले सभागृहात मान्य केले जाईलच असे नाही. आघाडीच्या बैठकीत एक विषय मंजूर करायचा ठरला, तर त्याला सभागृहात आक्षेप घेतला जातो. तो पुढील बैठकीला घ्या, असा आग्रह होतो. नगरसेवकांत समन्वय नसल्याचा हा परिणाम आहे. त्याला आता पक्षीय राजकारणाचा हस्तक्षेपही तितकाच कारणीभूत आहे. मंगळवारच्या सभेत कदम यांना रोखण्यासाठी एरव्ही सभागृहात चकार शब्दही न काढणारे पुढे होते, याचा अर्थ काय? त्यांना तसा कोणी आदेश दिला, हा चर्चेचा विषय आहे. कदम माजी महापौर आहेत, तर जयंत पाटील प्राध्यापक तसेच अभ्यासू नगरसेवक आहेत. त्यांनी सभागृहाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असताना मंगळवारी त्यांचे सभागृहातील वर्तन चुकीचे होते. त्यांनीच जर अशा प्रकारची भूमिका घेतली आणि अशा प्रकारांना प्रोत्साहन दिले, तर भविष्यात प्रत्यक्ष हाणामारी व्हायला व डोकी फुटायला वेळ लागणार नाही. त्याची जाणीव ठेवून सर्वचजण सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळतील, अशी अपेक्षा कोल्हापूरकरांना आहे. कायदेशीर मार्ग रोखण्याचा प्रयत्नमाजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नातेवाईक असलेल्या सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात घ्यायला कॉँग्रेस, राष्ट्रवादीने कमालीचा विरोध केला. नगरसेवकांच्या संख्याबळावर वाट्याला आलेल्या एक जागेवर कोणाचे नाव सुचवायचे, हा अधिकार गटनेत्याचा असतो. त्यांच्यामार्फत नामनिर्देशनपत्र भरले की औपचारिकता म्हणून सभागृहात त्या व्यक्तीचे नाव जाहीर करून संबंधित व्यक्तीला ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून नेमणूकपत्र द्यायचा अधिकार आयुक्तांचा असतो; परंतु आयुक्तांच्या अधिकारावर गदा आणून कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सुनील कदम यांची नेमणूक बहुमताच्या जोरावर नाकारली. कदम यांचा कायदेशीर मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी आपणाला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपण आता स्वस्थ बसू देणार नाही; त्यांचे पितळ उघडे पाडणार, त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार, अशी भूमिका घेऊनच सुनील कदम महापालिकेत प्रवेशकर्ते झाले. गेल्या दोन-तीन महिन्यांत त्यांनी ताराराणी चौकातील ‘केएमटी’च्या जागेतील पार्किंगचा विषय उघड केला. प्रशासनाला कारवाई करायला भाग पाडले. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारी नगरसेवकांच्या ‘इंटरेस्ट’च्या विषयावर कीस पाडण्यास सुरुवात केली. महापालिकेतील गोंधळाच्या कारभारावर टीका करायला सुरुवात केली आहे. कदम यांची भूमिका ही द्वेषातून तयार झाली असल्याचे त्यांच्या सभागृहातील वर्तनावरून दिसते. ‘प्रत्येक गोष्टीत मीच बोलणार’ हा त्यांचा आग्रहसुद्धा सभागृहातील वातावरण बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी ? सुनील कदम यांची गेल्या दोन महिन्यांतील भूमिका लक्षात घेतली तर त्यांनी केवळ नेते आणि कारभारी यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कदम हे आपली डोकेदुखी झाल्याचे कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांना कळून चुकले आहे. ईर्षेला पेटलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनीही आता आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले आहे. जशास तसे उत्तर देण्याची त्यांची तयारी झाली आहे. मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत त्याची झलक पाहायला मिळाली. कदम यांना बोलण्यापासून रोखण्याचा वारंवार प्रयत्न झाला. सभागृहात बोलण्याचा अधिकार सर्वच नगरसेवकांना आहे. तरीही कदम यांना अडविले गेले. दुसरी गोष्ट अशी की, बोलण्याचा अधिकार आहे म्हणून सगळ्याच विषयांवर बोलण्याचा आग्रह धरणे आणि सभागृहाचा वेळ घेणे हेही योग्य नाही; पण, ही चूक कदम यांच्याकडून होताना दिसते.
भांडखोर नगरसेवकांना आवरायचं कोणी?
By admin | Published: September 29, 2016 12:23 AM