कदमवाडी : पालिकेच्या कचरा डेपोमध्ये मंगल राजेंद्र दावणे (वय ६०) या कचरा वेचक महिलेचा मशीनमध्ये सापडून दुर्दैवी अंत झाला. मात्र, या कचरा वेचक महिलांवर नियंत्रण कोणाचे असते, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये रोज सुमारे २०-२५ महिला कचऱ्यातील प्लास्टिक तसेच स्क्रॅप गोळा करत असतात. या कचरा डेपो ठिकाणीच त्यांनी गोळा केलेल्या प्लास्टिक स्क्रॅपचा ढीग लावला आहे.
पण या कचरा वेचक महिलांवर नियंत्रण कोणाचे असते हेच आजपर्यंत समजले नाही. याठिकाणी ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी परिस्थिती आहे. याठिकाणी कोण येते, कोण जाते याची चौकशी कोणी करत नाही. त्यामुळे शहरातील कचरा वेचक महिला इथे केव्हाही येतात आणि कचरा वेचत असतात.
सध्या या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे काम बायो रिस्टर इंडिया या कंपनीकडून चालू आहे. या कंपनीकडे सध्या १५ महिला कचऱ्यातील प्लास्टिक, कापड व स्क्रॅपचे विलगीकरण करण्यासाठी कामाला आहेत. त्यांचे काम दुपारी १ ते ७ या वेळेत असते. तत्पूर्वी या महिला सकाळी लवकर येऊन बाहेरील कचऱ्यातील स्क्रॅप गोळा करत असतात. दुपारी १ च्या आत जे स्क्रॅप गोळा होईल ते या महिला आपल्याला घेतात व दुपारी १ नंतर मशीनवर कचरा वेगळा करताना जे स्क्रॅप सापडेल ते कंपनीला दिले जाते. त्यामुळे या महिला आपल्याला जास्त स्क्रॅप मिळावे यासाठीच भल्या पहाटेपासूनच कचरा वेचत असतात.
मात्र, या महिलांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने असे अपघात घडत आहेत. येथील कचऱ्याला वारंवार आग लावली जाते. या आगीमध्येही वारंवार किरकोळ अपघात होत असतात. इथे कचरा वेचणाऱ्या महिला या मशीन चालू असतानाच मशीनच्या पुढे-मागे करत असतात, त्यामुळे मशीन चालकाने वारंवार सांगूनही कोण ऐकत नाही. मुळात या महिलांना पालिकेच्या जागेत कचरा वेचण्याची परवानगी कोणी दिली व याच्यावर नियंत्रण कोणाचे हेच समजत नसल्याने इथे कोणीही येत आणि कचरा वेचत बसत.
-------------
महिलांचीच अरेरावी
मशीन चालू असताना जास्त स्क्रॅप मिळेल म्हणून या महिला मशिनच्या मागे-पुढे करत असतात या वेळेस या महिलांना पालिकेच्या मुकादमने हटकल्यास त्या मुकादमलाच अरेरावी करतात.
------------
प्रकल्पस्थळावर थाटलेय स्क्रॅपचे दुकान
सदर प्रकल्पस्थळावर गोळा केलेले स्क्रॅप या महिला एका ठिकाणी साठवून ठेवत असत व एकदम घेऊन जात. कालांतराने या प्रकल्पस्थळावरच एका महिलेने स्क्रॅपचे दुकान टाकले असून इथे मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवला जात आहे.
-------------
दोन दिवसांपूर्वीच कामावर.
या घटनेत मृत झालेली महिला मंगल राजेंद्र दावणे ही दोन दिवसांपूर्वीच बायो रिस्टर इंडिया या कंपनीकडे बेल्टवर कचरा वेचण्यासाठी रूजू झाली होती. तिची कामाची वेळ दुपारी १ वाजता असताना देखील ती लवकर येऊन बाहेर कचरा वेचण्याचे काम करत होती.
-----------
फोटो ओळ
पालिकेच्या कचरा डेपोमध्ये महिला मशीनची भीती न बाळगता कचरा गोळा करत असतात.
(छाया : दीपक जाधव)