कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केलेले आमदार कै. पी. एन. पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची एकूण संपत्ती ४ कोटी ७ लाख ४० हजार १४७ रुपयांची असल्याचे गुरुवारी उघड झाले. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञा पत्रातून त्यांनी ही संपत्ती जाहीर केली आहे. जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडे यांनी संपत्तीचे विवरण अजून दाखल केलेले नाही.करवीर मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले राहुल यांच्याकडे रोख ५० हजार तर पत्नी तेजस्विनी यांच्याकडे २५ हजार रुपये आहेत. श्रीपतरावदादा, कमिर्शिअल, रत्नाकर या बँकेत आर्थिक गुंतवणूक आहे.राहुल यांच्याकडे फॉच्युनर, सात लाखांची हार्ली डेव्हिडसन दुचाकी, दोन महिंद्रा बोलेरो, ११ बुलडोझर, एक व्हील लोडर मशीन आहे. या दोघांकडे प्रत्येकी १५० ग्रॅम सोने आहे. चांदी सहा किलो आहे. सडोली येथे वारसा हक्काने मिळालेली ४५ एकर ८५ गुंठे शेतजमीन आहे. नागदेवाडी येथे ८०० चौरस फूट इमारत, पाच हजार चौरस फूट वर्कशॉप शेड तर राजारामपुरी आठवी गल्ली, सडाेली खालसा येथे घर आहे. ठाण्यात म्हाडामध्ये सदनिका आहे. ते शेती आणि व्यवसाय करतात. त्यांचे वार्षिक उत्पत्न ४ लाख १० हजार ६८० रुपये आहे. त्यांचे शिक्षण बीकॉम, एमबीए (इंग्लंड) झाले आहे. त्यांच्यावर कोणत्याही बँकेचे कर्ज नाही.
- जंगम मालमत्ता : २ कोटी २१ लाख ४८ हजार १९७ , पत्नी : १२ लाख ४४ हजार ९५०
- स्थावर मालमत्ता : १ कोटी ७३ लाख ४७ हजार