चंद्रकांत कित्तुरेआज गुरूपौर्णिमा. गुरुजींना वंदन करण्याचा, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्याचा दिवस. गुरू-शिष्याचे नाते अधिक दृढ करणारा दिवस. खरंच आपल्या आयुष्यातून गुरुला वगळले तर... विचारच करून पहा. आपले आयुष्य दिशाहीन, भरकटलेले असते असे वाटल्याशिवाय राहत नाही. कारण अगदी जन्मापासूनच आपल्याला शिक्षणाची, शिकविण्याची गरज असते. जी मातेपासून होते. म्हणूनच म्हटले आहे की, आई माझा गुरू, आई कल्पतरू. आई ही आपली पहिली गुरू असते, जी आपल्याला बोलायला शिकविते, जगाची ओळख करून देते. कसे वागायचे, काय करायचे, काय करायचे नाही, चांगले काय, वाईट काय हे जाणून घेण्यास शिकविते. वडिलांचाही यात वाटा असला, तरी आई हीच प्रामुख्याने आपल्या मुलावर संस्कार घडविण्याचे कार्य करीत असते. त्यामुळेच आईला आपला पहिला गुरू मानले आहे.
शाळेत आपल्याला दुसरा गुरू मिळतो तो शिक्षकाच्या रूपात. बालवाडी असेल, प्राथमिक शाळा असेल, तेथे शिक्षक, शिक्षिका मुलांना लिहायला, वाचायला शिकवितानाच सुसंस्काराचे धडेही देतात. येथेच आपल्याला गुरू-शिष्य या नात्याची ओळख होते. गुरू-शिष्याची परंपरा भारतात फार मोठी आहे. पुराण काळापासून ती चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळात गुरुकुल पद्धती होती. राजपुत्रासह सर्वच विद्यार्थी विद्यार्जनासाठी गुरुच्या घरी जात. तेथेच राहत. गुरू-शिष्य म्हटले की ‘महाभारता’तील एकलव्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. द्रोणाचार्यांनी शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या पुतळ्यालाच गुरू मानून विद्यार्जन करणारा आणि गुरुदक्षिणा म्हणून स्वत:च्या उजव्या हाताचा अंगठा कापून देणारा एकलव्य महानच होता.
जी विद्या आपण शिकली आहे ती या गुरुदक्षिणेमुळे व्यर्थ ठरणार आहे. तिचा काहीच उपयोग होणार नाही हे माहीत असूनही त्याने द्रोणाचार्यांनी मागितलेली गुरुदक्षिणा क्षणाचाही विचार न करता देऊन टाकली. यात महान समजल्या जाणाऱ्या गुरूच्या कोत्या मनोवृत्तीचेही दर्शन होते. सर्वच गुरू सर्वांना समान विद्यादान करतात असे नाही. त्यातही त्यांचा एखादा आवडता, एखादा नावडता शिष्य असतोच.आज पूर्वीप्रमाणे गुरुकुल पद्धती नसली तरी शाळा, महाविद्यालये आहेत. शाळांमध्ये शिक्षकाच्या रूपाने दुसरा गुरू भेटल्यानंतर महाविद्यालयीन जीवनात प्रवेश होताच प्राध्यापकाच्या रूपाने तिसरा गुरू भेटतो. आजकाल शिक्षणाला व्यावसायिक स्वरूप आले असल्यामुळे या तिसºया गुरूचे शिष्याच्या मनातील स्थान पूर्वीएवढे आत्मीयतेचे असल्याचे दिसत नाही. तरीही भावी पिढी घडविण्यासाठी तळमळीने शिकविणारे, आपले विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत यासाठी धडपडणारे शिक्षकही काही कमी नाहीत.हे झाले शिक्षणक्षेत्रातील गुरूच्या बाबतीत.
तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्यासाठी एखादा मार्गदर्शक, गुरू असायलाच हवा. जो तुम्हाला अडचणीच्या काळात योग्य ते मार्गदर्शन करेल, अडचणीतून बाहेर काढेल, तुमच्या यशासाठी आवश्यक तो मार्ग दाखवेल, तोच खरा आदर्श गुरू म्हणावा लागेल. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे असा आदर्श गुरू भेटलेला असतो. त्याच्यामुळे आयुष्याला नवी कलाटणी मिळते. जीवनात उभारी येते.
यशाचा नवा मार्ग गवसतो. अशा या गुरूच्या ऋणातून उतराई होणे कुणालाही शक्य नसते. मात्र, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरूचे स्मरण करणे, त्याला वंदन करणे, गुरुदक्षिणा देणे शिष्य करीत असतात. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. गुरूही आपल्या शिष्याला यशासाठी भरभरून आशीर्वाद देत असतात.
व्यावहारिक जीवनातील गुरूबरोबच आध्यात्मिक जीवनातही गुरूची आवश्यकता असते. किंबहुना गुरूशिवाय तुम्ही कितीही साधना केलीत तर त्याचे अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आध्यात्मिक गुरूला आपल्या समाजात फार मोठे स्थान आहे. मुळात आपला समाज देवभोळा आणि अंधश्रद्धाळू आहे. त्यामुळे आध्यात्मिक गुरूंची संख्याही काही कमी नाही. महर्षी व्यासांपासून अशा गुरूंची परंपरा सुरू होते. या थोर परंपरेला अलीकडील काळात काही गुरूंमुळे गालबोट लागल्याचे दिसते. कारण या गुरूंची ‘कथनी अन् करणी’ वेगळी असल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. काहीजण तर अद्याप तुरुंगात आहेत. त्यांच्यामुळे गुरूबद्दल समाजाच्या मनात असलेल्या समजाला हादरे बसले आहेत. असे असले तरी गुरूशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे याची जाणीव प्रत्येकाला असते. त्यामुळे प्रत्येकजण एका आदर्श गुरूच्या शोधात असतो. ज्याला तो भेटतो, त्याचे जीवन सफल होऊन जाते. म्हणूनच म्हटले जाते...गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:, गुरुर्देवो महेश्वर:।गुरु:साक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरूवे नम:।।