दत्ता लोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या पात्र, अपात्र सभासदांचा निकाल लागला. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात अपात्र सभासदांचा रोष त्याचबरोबर पात्र सभासदांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.या निर्णयामुळे माजी अध्यक्ष के. पी. पाटील गटाला हादरा बसला असला तरी सत्ताधारीमधील चार संचालक हे सध्या विरोधी आमदार प्रकाश आबिटकर गटात असल्याने पात्र झालेले सभासद आपल्या मतांचे दान कोणाच्या पारड्यात टाकणार, तर अपात्र सभासद कोणाला हिसका दाखविणार, अशी चर्चा आहे. या निवडणुकीत अपात्र सभासद, बिद्रीचा के. पी. पाटील यांचा कारभार व प्रशासकीय कारभार या मुद्द्यांवर प्रचाराचा नूर असणार आहे.
बिद्री साखर कारखान्याची सन २00९ ची पंचवार्षिक निवडणूक ही ४७ हजार ८३८ सभासदांमध्ये झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ४३८४ सभासदांची झालेली वाढ, तर जून २0१२ ला सत्ताधारी के. पी. पाटील गटाने १४ हजार ५६३ नवीन सभासद केले. त्यानंतर विरोधकांनी तक्रार केली. हा वाद गेली अनेक वर्षे सुरू होता. उच्च न्यायालयाने सर्व सभासद रद्द करून जुन्या सभासदांवर निवडणूक घ्यावी, असे सूचित केले. त्यावेळी विरोधी आमदार आबिटकर, दिनकरराव जाधव, आदी मंडळींनी न्यायालयीन लढा जिंकल्याने आनंद साजरा केला. त्याचवेळी सत्ताधारी के. पी. पाटील गटाला मोठा हादरा बसला.
त्यानंतर के. पी. पाटील यांनी सदर निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला व सदर सभासदांची सहकार कलम ११ नुसार चौकशी करण्याचे आदेश दिले. ही छाननी प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयात प्रदीर्घ कालावधीनंतर पात्र-अपात्रतेचा फैसला झाला. त्यामध्ये ९ हजार ८२0 सभासद अपात्र झाल्याने के. पी. पाटील गटाला हादरा बसल्याची चर्चा असली तरी पात्र झालेल्या ४७४३ सभासदांपैकी बहुतांशी सभासदांचा पाटील गटाला लाभ होणार आहे. त्यातील तत्कालीन संचालक मंडळातील बदलत्या राजकीय समीकरणानुसार आमदार आबिटकर गटात असल्याने संचालक विजसिंह मोरे, के. जी. नांदेकर, राजेखान जमादार, डी. एस. पाटील यांचा ही पात्र-अपात्र सभासद यादीत समावेश आहे. त्यामुळेच पात्र-अपात्रतेचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, हे निकालात स्पष्ट होईल.
गेली १0 वर्षे बिद्रीचा कारभार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी केलेला कारभार, सहवीज प्रकल्प यावर अनेकदा विरोधकांनी तोंंंंडसुख घेतले. सहवीज प्रकल्प उभारण्यावेळी तर काढलेले कर्ज, मशिनरी यावरून टोकाची टिका करण्यात आली. मात्र, त्याच प्रकल्पाने कारखान्याची आर्थिक घडी सक्षम झाली. सहवीज प्रकल्पासाठी ११0 कोटींचे कर्ज काढण्यात आले. तर हा प्रकल्प सुरू झाल्यापासून १६९ कोटी ४0 लाख रुपयांचे उत्पन्न वीज विक्रीतून कारखान्यास मिळाले आहे. त्याचबरोबर गेल्या दशकामध्ये केलेल्या कारभाराचा लेखाजोखा पाटील गटाकडून मांडला जाणरा आहे.
तर विरोधी गटाकडून मोठ्या प्रमाणात झालेले बोगस सभासद त्याचप्रमाणे कारभारातील त्रुटींवरती प्रचाराचा मुद्दा केला जाणार आहे. तसेच दोन वर्षे कारभार करीत असलेले प्रशासकीय मंडळ यांच्या कारभारातील विकासाच्या मुद्द्यांवर आमदार आबिटकर गटाकडून चर्चा होण्याची शक्यता आहे.अपात्र सभासदांची साखर बंदसभासदांना ऊसदरापेक्षा साखरेचे महत्त्व अधिक असते. सभासदांना सवलतीच्या दरात प्रति महिना, तसेच दिवाळीला पाच किलोप्रमाणे ६५ किलो साखर दिली जाते. मतदानाचा हक्क गेला तरी चालेल, परंतु साखर मात्र प्रत्येकाला हक्काची वाटते. अपात्र ठरलेल्या ९८२0 सभासदांना गेली अनेक वर्षे साखर मिळत होती. ती साखर त्यांच्या अपात्रतेमुळे बंद होणार आहे. याबाबतच्या सूचना साखर वितरित होणाºया संस्थांना देणार असल्याचे समजते. साखर बंदमुळे या सभासदांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होणार आहेत.