कोल्हापूर : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे पाय चाटायला कोण गेले होते, याचे उत्तर आधी द्या, अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे. सत्ता हातातून गेल्यानेच शेलार व त्यांच्या टोळक्यांची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली आहे. तुणतुणे वाजवायची वेळ त्यांच्यावर आली आहे, आमच्यावर नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
येडेमच्छिंद्र येथे किसान आत्मनिर्भर यात्रेच्या प्रारंभ कार्यक्रमात आशिष शेलार यांनी, विधानपरिषदेच्या आमिषासाठी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे, आडत दलालासाठी ते तुणतुणे घेऊन उभे आहेत, अशी टीका केली होती. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनीही, आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे म्हणून रस्त्यावरची लढाई करत आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या घरात दोन जनावरे आहेत, त्यांना व्यावसायिक दराने वीज बिल आकारण्याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने घेतला आहे. भाजपचे सरकार शेतकऱ्यांसाठी हेच करत आले आहे, यावर आशिष शेलार गप्प का, असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांविषयी असे वागणाऱ्या भाजपच्या मागे शेतकऱ्यांनी का यावे, याचे आधी शेलारांनी उत्तर द्यावे. आम्हाला कुणाचे तुणतुणे हातात घेऊन बसायची सवय नाही. ते हातात घेण्याची वेळ कुणावर आली आहे, याचे स्वत: शेलारांनीच आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.