चंद्रकांत कित्तुरे ल्ल कोल्हापूरअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकटाचा सुगावा त्यांच्या हत्येपूर्वी एक-दोन महिने आधी कोल्हापुरातील एका पोलिसाला लागला होता. तशी टीप त्याला खबऱ्याकडून मिळाली होती, असा दावा आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी एका टिष्ट्वटद्वारे केला आहे. यामुळे कोल्हापुरातील ‘तो’ पोलिस कोण? त्याला मिळालेल्या माहितीचा सखोल पाठपुरावा झाला की नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात झाली. त्यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. याप्रकरणी सनातन संस्थेवर सुरुवातीपासून संशय व्यक्त केला जात आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात, तर ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या तिघांच्याही हत्येमागे सनातन ही संस्था असल्याचा आरोप केला जात आहे. त्या दृष्टीने तपास संस्थांनी आपला तपासही सुरू ठेवला आहे. पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. तपास संस्थांच्या हाती या तीनही हत्येमागे समान धागेदोरे असल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्याकटाचा छडा लागून मारेकऱ्यांची ओळख तपास संस्थांना पटल्याचा दावा आशिष खेतान यांनी बुधवारी एका टिष्ट्वटद्वारे केला होता. सीबीआयनेही बुधवारी सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकर यांच्या पुण्यातील घरावर तसेच पनवेल येथील सनातनच्या आश्रमावर छापा टाकला. यामुळे खेतान यांच्या दाव्याला पुष्टी मिळाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सीबीआयने याप्रकरणी अधिकृतपणे या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. दाभोलकर यांची हत्या होणार असल्याची टीप कोल्हापुरातील एका पोलिसाला त्यांच्या हत्येपूर्वी एक-दोन महिने आधीच मिळाली होती. त्याने आपल्या वरिष्ठांना याची कल्पनाही दिली. मात्र, वरिष्ठांसमोर त्याला याबाबतचा अधिक तपशील देता आला नाही, असे चौकशीत दिसून आले होते, असा दावाही खेतान यांनी यासंदर्भात केलेल्या पुढील टिष्ट्वटमध्ये केला आहे. त्यामुळे हत्येपूर्वीच एक-दोन महिने आधी टीप मिळालेला ‘तो’ पोलिस कोण? याची चर्चा आता पोलिस वर्तुळात सुरू झाली आहे. ...तर दाभोलकरांची हत्या टळली असती !पोलिस सूतावरून स्वर्ग गाठतात आणि कोणत्याही गुन्ह्याचा छडा लावतात, असे म्हटले जाते. त्यानुसार या पोलिसाला मिळालेल्या माहितीच्या आधारे कसून पाठपुरावा केला गेला असता, तर कदाचित डॉ. दाभोलकर यांची हत्या टळली असती, अशी चर्चा आता पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
हत्याकटाची टीप मिळालेला कोल्हापूरचा ‘तो’ पोलिस कोण?
By admin | Published: June 03, 2016 1:43 AM