हुपरी : मतदार संघातील गावांचा व सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासकामे राबविताना आम्ही कधीही जातपात व राजकीय गट-तट न पाहता केवळ गावाचा विकास होण्यासाठीच निधी उपलब्ध करून दिला जातो. सध्या मात्र राज्याच्या मंत्रिमंडळात समाजकल्याण व अल्पसंख्याक खात्याचे मंत्रीच नसल्याने सामाजिक विकासासाठी निधी कुणाकडे मागायचा? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले.रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात पेव्हिंग ब्लॉक बसविणे व मुस्लीम समाज कब्रस्तानची संरक्षक भिंत बांधकामाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. सरपंच सुप्रिया पाटील अध्यक्षस्थानी होत्या.ते म्हणाले, रेंदाळ गावात नागरी विकासकामे उभारण्यासाठी आतापर्यंत सुमारे दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढील कालावधीत गावांतील अंतर्गत सर्व रस्त्यांचे डांबरीकरण तसेच पाणीपुरवठा योजनेतील सर्व अडथळे व त्रुटी दूर करून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.यावेळी सरपंच सुप्रिया पाटील, लियाकत मुजावर, शब्बीर मोमीन, शिवाजी पाटील, रोशन मानकापुरे, पल्लवी पाटील, अविनाश घोडेस्वार, सादिक मोमीन यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता पाटील, उषा चौगुले, महेश कोरवी, सचिन पुजारी, अरुण महाजन, मन्सूर नायकवडे, माणिक पतंगे, बापू नायकवडे, तानाजी घोडेस्वार आदी यावेळी उपस्थित होते. धनाजी करवते यांनी स्वागत केले व आभार अस्लम मुजावर यांनी मानले.
सामाजिक विकासासाठी निधी मागायचा कुणाकडे?, आमदार राजू आवळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 12:34 PM