कोल्हापूर : गतवेळच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याकरिता राष्टÑवादी व कॉँग्रेस पक्षाने आखलेली नियोजनबद्ध राजकीय व्यूहरचना, स्वत:ची जागा सुरक्षित राहावी म्हणून ‘स्वाभिमानी’ने भाजप-शिवसेनेशी केलेली युती आणि कॉँग्रेसने नाकारल्यामुळे स्वाभिमान दुखावलेल्या खासदार सदशिवराव मंडलिक यांनी पुरोगामित्वाला छेद देत मुलाला घेऊ दिलेली शिवसेनेची उमेदवारी अशा मतलबी राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर सर्वसामान्य मतदारांनी कोणाला झुकते माप दिले आहे, याचा फैसला उद्या, शुक्रवार मतमोजणीनंतर होईल. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत कोणाचा विजय होणार, यावर त्यांचे राजकीय भविष्य तर उज्ज्वल होईलच आणि ज्यांचा पराभव होईल, त्यांना मात्र त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी भविष्यकाळात झगडत राहावे लागणार आहे. काहीही होवो, निवडणूक निकालानंतर मात्र जिल्ह्याच्या नव्या राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी कोल्हापूर व हातकणंगलेमधून उमेदवार कोण याबाबत आधी चर्चा रंगली. कॉँग्रेस व राष्टÑवादीत उमेदवारीवरून बराच कलगीतुरा गाजला. कोल्हापूरवर आमचाच हक्क म्हणून कॉँग्रेसवाल्यांनी बरेच ढोल बडविले. मात्र, राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे कोल्हापूर राष्टÑवादीला, तर हातकणंगले कॉँग्रेसला अशी वाटणी झाली. त्यामुळे कलगीतुर्यात अडकलेले दोन्ही पक्षांचे नेते नंतर गळ्यात गळे व हातात हात घालून झाडून कामाला लागले. पवार यांच्या रणनीतीची चाहूल आधीच लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धोका पत्करण्याऐवजी शहाणपणाने महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. कॉँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी महायुतीत सहभागी व्हावे, असा प्रस्ताव खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्यासमोर ठेवला. मंडलिकांनीही तो राजकीय अपरिहार्यता मानून धुरंधरपणा दाखवीत चिरंजीव संजय मंडलिक यांना निर्णय घेण्याची मोकळीक दिली. त्यातून मग सेनेच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे हे मुद्दे मतदारांसमोर मांडण्यात आले. साखर उद्योगात शेतकर्यांची होणारी फसवणूक आणि त्यांना मिळणारा कमी दर हा मुद्दाही महायुतीने मांडला; तर दुसर्या बाजूने कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी विकासाची केलेली कामे, जनतेला दिलेल्या आरोग्याच्या सुविधा, अन्नसुरक्षा कायदा, रोजगाराच्या संधी, आदी मुद्द्यांवर प्रचारात भर देण्यात आला होता. नरेंद्र मोदी फॅ क्टर आणि बदल हवा या दोन मुद्द्यांचीही निवडणुकीत जोरदार चर्चा झाली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात साम, दाम, दंड, भेद या राजकारणातील चतु:सूत्रीचाही वापर करण्यात आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांच्या मनात काय होते याचा नेमका अंदाज कोणालाच बांधता न आल्याने निकाल काय लागणार याबाबत जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. सहकाराचे मजबूत जाळे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातून भाजप-शिवसेनेला आतापर्यंतच्या इतिहासात एकही खासदार मिळालेला नाही. याउलट कॉँग्रेस व राष्ट्रवादीने मात्र गतवेळचा एक अपवाद वगळता येथील जागा सातत्याने जिंकल्या आहेत. त्यामुळेच कोल्हापूरची जनता पारंपरिक पद्धतीने कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या मागे जाणार की नव्या परिवर्तनाच्या वाटेवर जाणार, याचा फैसला उद्या, शुक्रवार मतदान यंत्रे उघडल्यावरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
आवाज कोणाचा? आज फैसला महिन्याभराची प्रतीक्षा संपणार : निकालाचे जिल्ह्याच्या राजकारणावर होणार परिणाम
By admin | Published: May 16, 2014 12:35 AM