अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या कळंबा तलावाचे दहा कोटींचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामांतर्गत निविदाधारक कंपनीने गतवर्षी जुलैमध्ये तलाव परिसरात व तलावाच्या हद्दीलगत चार हजार झाडे लावून संवर्धित केली. सहा महिन्यांनंतर हे काम पालिका पाणीपुरवठा विभागास हस्तांतरित केले.पाणीपुरवठा विभागाने दोनवेळा तीन महिन्यांची मुदतवाढ घेतली. तज्ज्ञ कर्मचारी वर्गाअभावी उद्यान विभागाने झाडे संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे पाणीपुरवठा विभागाचे मत होते. पालिका हद्दीतील उद्यानांच्या संवर्धनासाठी कर्मचारी वर्ग तोकडा पडत असल्याने हे काम पाणीपुरवठा विभागाने करावे असे सांगत उद्यान विभागाने जबाबदारी झटकली. त्यामुळे लाखो रुपये खर्चून फुलविलेल्या या नंदनवनाचे संवर्धन करायचे कोणी? हे अनुत्तरीत आहे. प्रशासनाच्या ताकतुंब्यात ही हिरवळ करपण्याची शक्यता आहे.कळंबा तलाव परिसर हा कधीकाळी पशु-पक्षी, प्राणी, वनस्पतीबाबत समृद्ध होता. उत्तम हवामान, मुबलक पर्जन्य, चांगली मृदा यामुळे परिसरात वृक्षसंपदेचा नैसर्गिक ठेवा मुबलक होता. त्यामुळे दोनशेपेक्षा अधिक देशी-विदेशी पक्षी तलावावर आढळत होते. पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामे, प्रदूषण व बेसुमार वृक्षतोडीने हा परिसर उजाड बनला. तलावास गतवैभव प्राप्त व्हावे, तलावाभोवती नव्याने वनसंपदा विकसित करून तलाव प्रदूषणमुक्त राहावा, परिसरात नागरिकांना मन:शांतीसह विरंगुळा प्राप्त व्हावा यासाठी गतवर्षी १ जुलैला सुशोभीकरणाच्या कामांतर्गत तलाव परिसरात व तलाव हद्दीलगत चार हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले होते. चार हजार वृक्षारोपणासह तलाव परिसरात नागरिकांना विरंगुळा मिळावा यासाठी गवताचे लॉनही विकसित करण्यात आले. तलाव परिसरातील वृक्षांना लोखंडी ट्री गार्ड बसविण्यात आले. कळंबा-गारगोटी रस्त्यालगत तलावाच्या सीमेच्या हद्दीवर लावण्यात आलेल्या दोन हजार विविध प्रजातींच्या रोपांना दोन बोअरच्या पाण्यावर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत पाणी देण्यात आले. सहा महिने वृक्षांचे योग्यरीत्या संवर्धन केल्यावर ही वनसंपदा पालिका पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत व संवर्धनाच्या जबाबदारीबाबत पत्राने कळविण्यात आले. पालिका पाणीपुरवठाविभागाने दोनवेळा तीन महिन्यांची मुदतवाढ घेत जबाबदारीझटकली.दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने या वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी पुरेसा तज्ज्ञ कर्मचारी वर्ग नसल्याने उद्यान विभागाने याची जबाबदारी स्वीकारण्याबाबत कळविले. दुसरीकडे उद्यान विभागानेही पालिका हद्दीतील उद्याने संवर्धन करण्यासाठीच कर्मचारी कमी पडत असल्याचे सांगत हात वर केले.झाडे जगवली, वाढविली तरच पर्यावरणाचे संतुलन योग्य राहून पाऊस पडणार हे निश्चित. वृक्षतोडीने निर्माण झालेल्या पर्यावरणाचा असमतोल दूर करण्यासाठी एकीकडे शासन सामाजिक संस्था ‘एकच लक्ष शतकोटी वृक्ष’ मोहीम राबवीत असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या ताकतुंब्यात वनसंपदा कोमेजत आहे, ज्यामुळे वनसंपदा विकसित करत तलावास नवसंजीवनी प्राप्त करून देण्याच्या हेतूतील गांभीर्यच निघून जात आहे.कर्मचारीचनियुक्त नाहीकळंबा तलावाची मालकी पालिकेची आहे; पण तलावाच्या संवर्धनासाठी कर्मचारी नियुक्त नसल्याने २० एकरांत अतिक्रमण झाले आहे. सुशोभिकरणाची नासधूस सुरू असून, अशास्त्रीयरीत्या गाळ उपसा सुरू आहे. परिसराचा वापर मद्यपी, प्रेमीयुगुले व पार्ट्यांसाठी होत आहे. त्यामुळे कर्मचारी नियुक्ती गरजेची आहे.
कळंबा परिसरातील चार हजार झाडे जगवायची कोणी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:44 AM