कोल्हापूर : ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा एन. डी. स्टुडिओ चर्चेत आला आहे, तसा भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ अनुभवलेला ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओदेखील नव्याने चर्चेत आला आहे. जयप्रभा स्टुडिओची जागा कोणाच्या तरी घशात घालण्यापेक्षा स्टुडिओचे गतवैभव तसेच सांस्कृतिक इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याच्या हेतूने राज्य सरकारनेच तो विकत घ्यावा, अशी मागणी असतानाही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. कोल्हापूरकरांच्या मागणीमुळे महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव कित्येक महिने राज्य सरकारच्या कपाटातच पडून आहे.जयप्रभा स्टुडिओ भारतीय चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास आहे. या इतिहासाचे एक एक पान गळून पडले, तसे स्टुडिओला ग्रहण लागले. स्टुडिओच्या गतवैभवापेक्षा, इतिहासापेक्षा त्याच्या जागेतून मिळणाऱ्या पैशांमुळे ‘नवश्रीमंत’ बिल्डरांचे डोळे गरगरले. त्यातून त्यांनी तुकडे तुकडे पाडत त्याचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला. तेरा एकर जागेवरील हा स्टुडिओ आणि परिसरातील जागा विकली गेली. राज्य सरकार व महानगरपालिकेच्या ‘वारसास्थळा’च्या यादीत समाविष्ट असलेली १४ हजार चौरस मीटर जागा व त्यावरील स्टुडिओच्या दोन भंगार इमारती एवढेच काय ते अस्तित्व राहिले होते. पण ही जागासुद्धा कोरोनाच्या काळात गुपचूप विकली गेल्याची बाब समोर आली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, कलाकार आणि कोल्हापूरकरांनी या स्टुडिओचे उरलेसुरले अस्तित्व अबाधित ठेवावे म्हणून आंदोलन उभारले. दीर्घकाळ ठिय्या आंदोलन चालले. अखेर प्रशासकीय पातळीवर चर्चा, बैठका सुरू झाल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या बैठकीत स्टुडिओ राज्य सरकारने खरेदी करावा आणि तो महापालिकेकडे सुपूर्द करावा किंवा राज्य सरकारने स्टुडिओ घेण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दीड वर्षात प्रस्तावासह दोन स्मरणपत्रेगेल्या दीड वर्षात राज्य सरकारकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यात हा स्टुडिओ लोकभावनेचा आदर म्हणून राज्य सरकारने विकत घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. स्टुडिओ विकत घेण्याची महापालिकेची आर्थिक कुवत नसल्याचेही प्रस्तावात नमूद केले होते. त्यानंतर दोन वेळा महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने राज्य सरकारला दोन स्मरणपत्रे पाठविली. त्याची उत्तरेही सरकारकडून मिळालेली नाहीत.सरकार एन. डी. स्टुडिओ घेणार?कर्जतजवळील नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर विधिमंडळात झालेल्या चर्चेवेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, एक मराठी माणसाने उभारलेला हा स्टुडिओ कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही, तो सरकारच्या ताब्यात घेण्याविषयी कायदेशीर बाबी तपासून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. जर एन. डी. स्टुडिओ सरकार घेण्याचा विचार करत असेल तर जयप्रभा स्टुडिओ का घेऊ नये, अशी विचारणा कोल्हापूरकर करत आहेत.
महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ शक्य तितक्या लवकर विकत घ्यावा व तेथे डबिंग, रेकॉर्डिंग व एडिटिंग रूम्सची व्यवस्था करावी. यासाठी लागणारा निधी फारच अल्प आहे, तरी शासनाने प्रयत्न करावा. नितीन देसाई यांचा स्टुडिओ शासनेने जरूर विकत घ्यावा. त्याचबरोबर जयप्रभा विकत घेऊन भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांचे कायमस्वरूपी स्मारक उभारावे - रामदार फुटाणे, कवी
- छत्रपती राजाराम महाराजांनी स्टुडिओसाठी जागा दिली
- मेजर दादासाहेब निंबाळकर यांनी भालजी पेंढारकरांना जागा दिली
- स्टुडिओची जागा १३ एकर होती
- १९४८ मध्ये दंगलीत स्टुडिओ जळून खाक झाला
- - त्यातूनही भालजींंनी त्याची नव्याने उभारणी केली
- स्टुडिओ चालविणे अशक्य झाल्याने ६० हजारांना लता मंगेशकर यांना विकला
- लता मंगेशकर यांनी साडेनऊ एकर जागा बिल्डरला विकली
- दोन वर्षांपूर्वी एलएलपी तत्त्वावर स्थापन झालेल्या संस्थेने उर्वरित साडेतीन एकर जागा खरेदी केली.
- जागेवर स्टुडिओचे आरक्षण नाही, पण वारसास्थळाच्या यादीत समाविष्ट