मराठी रंगभूमीवरील एक असामान्य प्रतिभेचा, गुणवान, कीर्तिवान गायक, नट असा कलावंत म्हणजेच केशवराव भोसले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून स्वदेश हितचिंतक नाटक मंडळींत प्रवेश. वयाच्या दहाव्या वर्षी शारदा नाटकातील ‘मूर्तिमंत भीती उभी’ या पदाने त्यांना कीर्ती मिळवून दिली. खुद्द राजर्षी शाहू छत्रपती यांनी त्यांना ‘वन्स मोअर’ची शाब्बासकी दिली. पुढे १९०८ साली वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ‘ललित कलादर्श नाटक मंडळी’ ही कंपनी सुरू केली. रंगभूमीला मखमली पडदा, ‘मानापमान’मधील धैर्यधराच्या छावणी असा अनेक प्रथा त्यांनी सुरू केल्या. शाहू छत्रपतींनी १९१६ साली केशवरावांना आपली कंपनी घेऊन कोल्हापूरला बोलावले. त्यांचा मोठा गौरव केला. पॅलेस थिएटरच्या मागे खासबाग मैदानात खुले नाट्यगृह तयार करून ‘मृच्छकटिक’ या नाटकाचा प्रयोग या रसिकराजाने आपल्या प्रजेस दाखवला. भा. वि. वरेकरांनी आपले ‘कुंजविहारी’ हे नाट्य शाहू छत्रपतींना अर्पण केले. त्याप्रसंगी छत्रपती त्यांना म्हणाले, ‘वरेकर, तुम्ही मला नाटक अर्पण केलेत, यात माझा मोठा मान आहे. आता माझा केशा (केशवराव भोसले) स्वत: उभा राहिला आहे. त्याला एक नाटक लिहून द्या; पण केशवला मात्र विसरू नका. केशा म्हणजे तळपती तलवार आहे. ती जर हाती मिळाली तर तुम्ही जग जिंकाल..’ याच केशवराव यांच्या नावे हे नाट्यगृह होते, जे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले..
Kolhapur: कोण होते केशवराव भोसले ?, खुद्द राजर्षी शाहू छत्रपती यांनी त्यांना दिली होती ‘वन्स मोअर’ची शाब्बासकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 12:47 PM