- विद्यमान नगरसेवक : अजित दत्तात्रय ठाणेकर
- आताचे आरक्षण : सर्वसाधारण महिला
इंदुमती गणेश, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे पावित्र्य लाभलेला तटाकडील तालीम प्रभाग यंदा सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्याने येथे आजी - माजी नगरसेवकांच्या उमेदवारांच्या पत्नी, सुनांनी निवडणुकीच्या रणांगणात शड्डू ठोकला आहे. प्रभागावर प्रामुख्याने भाजप आणि काही प्रमाणात शिवसेनेचा वरचष्मा असून, प्रभागात भाजपने सलग दोन वेळा बाजी मारली आहे. यंदा त्यांना हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे. दुसरीकडे या प्रभागात भाजपचा वारू रोखणार कोण, याचीही उत्सुकता आहे.
गत निवडणुकीत या प्रभागात भाजप, शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीने लढत झाली. यात भाजपचे अजित ठाणेकर यांचा दणदणीत विजय झाला. त्या आधी भाजपच्या प्रभा टिपुगडे यांनी प्रभागाचे नेतृत्व केले. ठाणेकर यांना शहरात क्रमांक दोनच्या मताधिक्याने नागरिकांनी विजयी केले. पाच वर्षांत त्यांनी प्रभागात एक कोटी १५ लाखांची विकासकामे केली असून, महापालिकेच्या विविध विभागांमधील भ्रष्ट व चुकीच्या कारभारांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला. ठाणेकर यांनी पालिकेचे उत्पन्न वाढीसाठीही वारंवार सूचना केल्या; परंतु आता ठाणेकर यांच्या कुटुंबातील कोणी महिला येथून निवडणूक लढविणार नाही. स्वत: ठाणेकर महालक्ष्मी मंदिर प्रभागातून लढणार आहेत. या प्रभागाने शहराला दोन महापौर, दोन उपमहापौर व एक स्थायी समिती सदस्य दिले आहे.
प्रभागावर भाजपचा वरचष्मा आहे. त्यामुळे भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या येथे जास्त आहे. भाजपने अनेकांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे नातेवाईक असलेल्या सागर जाधव यांच्या पत्नी नीलम जाधव यांनीही भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. एकेकाळी भाजपचे नगरसेवक असणाऱ्या आर. डी. पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या मागे ‘कमी बोलून जादा काम करून घेणार’ अशी ओळख असलेल्या आर. डी.च्या कामाचा मोठा अनुभव असणार आहे. चित्रपट व्यावसायिक मिलिंद अष्टेकर यांची मुलगी शुभदा योगेश्वर जोशी भाजपकडून लढण्यास इच्छुक असून, त्यांनी भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद नाही आला तर त्या अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. सारिका करण शिंदे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितल्याची माहिती आहे. सारिका यांचे पती करण शिंदे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यामुळे ते पत्नीसाठी चांगला जोर लावतील.
हिंदुत्ववादी संघटना तसेच फेरीवाला संघटनेचे महेश उरसाल यांनी आपली पत्नी मयूरी उरसाल यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांचाही प्रभागात मोठा जनसंपर्क आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते व रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या सून ऋतुजा तेजस जाधव यंदा महापालिकेच्या रणांगणात आहेत. राजू जाधव यांनीही यापूर्वी या प्रभागातून निवडणूक लढविलेली असल्याने त्यांचा अनुभव महत्त्वाचा असेल.
भाजपचा या प्रभागावर असलेला प्रभाव पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेला तसे तुल्यबळ उमेदवार मिळणे काहीसे जड जाणार आहे.
------------
प्रभागातील शिल्लक कामे
- अंबाबाई मंदिर व प्रमुख बाजारपेठ असल्याने पर्यटकांची वर्दळ असते. त्यांच्यासह शहरवासीयांना पार्किंगचा प्रश्न भेडसावतो.
- कपिलतीर्थ मंडईसह सगळा बाजार रस्त्यावरच बसतो. त्यामुळे ट्रॅफिक जॅम होऊन वाहतूक विस्कळीत होते.
- कपिलतीर्थ मंडई नूतनीकरण आराखडा, फेरीवाल्यांचे पुनर्वसन
- पिण्याचे पाणी व ड्रेनेज लाईनची काही कामे शिल्लक.
- काही रस्त्यांची कामे अपूर्ण .
-----
प्रभागात झालेली कामे
-कपिलेश्वर मंदिर, वांगी बोळसह भागातील गल्ल्यांमधील ड्रेनेज लाईन बदलल्या.
-माने गल्ली, महालक्ष्मी धर्मशाळा, माळी गल्ली येथील गटर्सची कामे पूर्ण.
-महापुरानंतर नुकसान झालेल्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
-कोरोना काळात नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांचा पुरवठा, आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा कवच.
-पॅसेज व रस्ते काँक्रिटीकरण,
-पंतप्रधान स्वनिधी योजना, फेरिवाल्यांची ऑनलाईन नोंदणी.
----------
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
अजित ठाणेकर (भाजप) : २ हजार १५१
उदय साळोखे (शिवसेना) : ९०५
राजेंद्र जाधव (अपक्ष) : ९०२
चंद्रकांत साळोखे : २६८
---
फोटो नं २५०४२०२१कोल-तटाकडील तालीम०१
ओळ : अंबाबाई मंदिर व मुख्य बाजारपेठ असलेल्या तटाकडील तालीम प्रभागात कायमच रस्त्यावरचा बाजार भरत असल्याने येथे पार्किंग व वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)