कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: जयश्री जाधव यांची हवा, सत्यजित कदम यांचाही दावा, निकालाची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 01:27 PM2022-04-14T13:27:04+5:302022-04-14T13:27:39+5:30
महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात ही काटाजोड लढत झाली
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत नक्की हवा कुणाची याची बुधवारी दिवसभर जोरदार चर्चा रंगली. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात ही काटाजोड लढत झाली आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले आहेत. परंतु काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या बाजी मारतील, असे सर्वसाधारण जनमानस तयार झाले आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. रिंगणात एकूण पंधरा उमेदवार असले तरी मुख्य लढत दुरंगीच झाली. ही जागा कोणत्याही स्थितीत जिंकायचीच या दृष्टीने दोन्ही पक्षांनी सर्व यंत्रणा कामाला लावल्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढतीतील चुरस कमी झाली नाही. मतदान किती होते याकडेही लोकांचे लक्ष होते.
पोटनिवडणुकीत सामान्यपणे कमी मतदान होते; परंतु या निवडणुकीत गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाएवढेच मतदान झाले आहे. मतांची टक्केवारी वाढली असती तर लोक बदल करण्याच्या हेतून बाहेर पडले असा एक तर्क काढला जातो. परंतु येथे दोन्ही बाजूंने आपापले मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न झाले आहेत.
काँग्रेसची हवा कशामुळे..
- मुख्यत: मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बुधवार, शुक्रवार पेठेचा परिसर आणि कसबा बाव़डा परिसरात काँग्रेसला चांगले मतदान झाल्याचा अंदाज त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. गेल्या निवडणुकीत शिवाजी पेठेने दिवंगत चंद्रकांत जाधव यांना चांगला हात दिला होता. या निवडणुकीत मंगळवार पेठेत जयश्री जाधव यांच्याबद्दल मोठी सहानुभूती राहिली. पेठेच्या उमेदवार म्हणून लोक स्वयंस्फूर्तीने मैदानात उतरल्याचे चित्र दिसले. त्याचा लाभ काँग्रेसला होण्याची शक्यता जास्त आहे. कसबा बावडा परिसरात सर्रास ७० ते ७२ टक्के मतदान झाले आहे. तेच निकालापर्यंत नेणारे असल्याचे काँग्रेसला वाटते.
- या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांवर दोन्ही पक्षांचे जास्त लक्ष होते. शिवसेनेचा पारंपरिक मतदार काँग्रेसच्या हातावर शिक्का मारणार नाही, अशी हवा तयार करण्यात आली होती. परंतु माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे आदींनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश मानून जिवापाड काम केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गडाला हादरे देण्यात फारसे यश आले नसल्याचे चित्र दिसते.
- महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत अगोदरपासूनच एकजूट आहे. परंतु यावेळेला या दोन पक्षांसह शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्यांतही मनोमिलन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रचारात या तिन्ही पक्षांत कुठे समन्वयाचा अभाव, विसंवाद फारसा दिसून आला नाही. सगळ्यांनी मिळून प्रचार यंत्रणा राबवली, मतदान बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
भाजपचा दावा कशाच्या बळावर..
- भाजपला मानणारा शहरात पारंपरिक मतदार आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाची मतदारांना अजूनही भुरळ आहे. पाच राज्यांतील यशानंतर भाजपची कोल्हापुरातही हवा तयार झाली होती. त्यामुळे कमळ या चिन्हाकडे पाहून चांगले मतदान झाल्याचे भाजपला वाटते.
- या निवडणुकीत हिंदुत्वाचा खरा तारणहार भाजपच आहे, असे चित्र बिंबवण्याचा प्रयत्न या पक्षाकडून पद्धतशीरपणे झाला. अगदी मतदान केंदापर्यंत जय श्रीरामचा गजर सुरू होता. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते काही झाले तरी हातावर शिक्का मारणार नाहीत, असा विश्वास भाजपला वाटत आहे. तो कितपत खरा ठरतो यावरच गुलाल ठरणार आहे.
- शिवाजी पेठ, मंगळवार पेठ व कसबा बावडा या ठिकाणी भाजपचा बेस कमी असल्याने तिथे या पक्षाने सुरुवातीपासूनच सर्वात जास्त आर्थिक ताकद व यंत्रणा लावली होती. मुख्यत: शिवाजी पेठेत लिड नाही मिळाले तरी चालेल; परंतु तिथे फार मोठी पीछेहाट होऊ नये असेही प्रयत्न भाजपकडून झाले. शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील पेठेतील कार्यकर्त्यांने शेवटच्या काही दिवसांत कमळ हातात घेतल्याचे सांगण्यात येते.
सगळ्यात जास्त मतदान झालेली
कसबा बावडा येथील भारतवीर सामाजिक सभागृह : ८०.४८ (एकूण मते-३४०)
कसबा बावडा गावकामगार तलाठी कार्यालय : ८०.३४ (एकूण मते-८३४)
कसबा बावडा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर : ८०.१४ (एकूण मते ११०८)
सगळ्यात कमी मतदान झालेले केंद्र
मध्यवर्ती विभागीय नियंत्रक कार्यालय (शिवाजी पार्क) - ४१.९९ (एकूण मते ९८६)