विनोद सावंत/ लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय असा सम्राटनगर प्रभाग क्रमांक ६३ आहे. वीस वर्षांनंतर प्रभाग सर्वसाधारण झाल्याने येथे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, आजी-माजी नगरसेवकांसह नवखे असे डझनभर उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या प्रभागावर कब्जा मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे.
गत निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चुरशीने लढत झाली. भाजपच्या जयश्री जाधव यांनी बाजी मारली. शिवसेनेच्या सुनीता हुंबे यांनी त्यांना कडवी झुंज दिली. त्यांचा १९३ मतांनी पराभव झाला. काँग्रेसच्या दीपाली ढोणुक्षे यांना १०७३ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाली.
जयश्री जाधव या आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आहेत. जयश्री जाधव यांनी गत निवडणूक भाजपमधून निवडणूक लढवली होती. पुन्हा निवडणूक लढवावी, अशी मागणी सम्राटनगरमधील नागरिक त्यांच्याकडे येऊन करत आहेत. लवकरच प्रभागातील नागरिकांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांचे निकटवर्तीय कपिल मोहिते हेही काँग्रेसकडून इच्छुक आहेत. त्यांचाही प्रभागात सामाजिक कामाचा अनुभव आहे.
शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते, माजी नगरसेवक राजू हुंबे यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. गत निवडणुकीत पत्नींचा पराभव झाला असताना त्यांनी खचून न जाता प्रभागात सामाजिक काम सुरूच ठेवले. २०१० मध्ये त्यांनी शिवसेनेतून महापालिकेत प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी प्रभागातील पाण्याची समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले. रस्ते, गटारीसह उद्याने विकसित केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रासाठी जागा मंजूर केली.
सर्जेराव साळोखे यांनीही जोमाने प्रचार सुरू केला आहे. माजी नगरसेविका माधुरी साळोखे यांचे ते चिरंजीव आहेत. माधुरी साळोखे यांनी २००५ ते २०१० मध्ये महापालिकेत प्रतिनिधित्व केले हाेते. त्यांनी प्रभागात रस्ते, गटारी, ड्रेेनेजलाइन केली. सर्जेराव साळोखे बांधकाम व्यावसायिक असून, तेही सामाजिक कामात अग्रेसर असतात. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात धान्य, सॅनिटायझर वाटप केले.
महापालिका माजी सभागृह नेते सुरेश ढोणुक्षे यांनीही प्रभागात गाठीभेटीवर जोर दिला आहे. ढोणुक्षे स्वत: आणि त्यांच्या पत्नी दीपाली ढोणुक्षे यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी ड्रेनेजलाइन, प्रॉपर्टीकर्डचा प्रश्न निकाली काढला. अंबाई डिफेन्स येथे उद्यान विकसित केले. कोरोनामध्ये २७० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या. मनपा जगदाळे शाळा लोकसहभागातून रंगरंगोटी केली.
इंद्रजित अभिजित शिंदे यांनीही प्रचारात आघाडी घेतली असून, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचे नातू आणि दिवंगत अभिजित शिंदे सरकार यांचे ते चिरंजीव आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते सामाजिक कामात आहेत. अभिजित शिंदे सरकार युवा मंचच्या वतीने रक्तदान शिबिर, मनपा शाळांना मदत, स्वच्छता अभियान अशी सामाजिक कामे करतात. ते भाजप, ताराराणी आघाडीकडून इच्छुक आहेत.
व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी घोरपडे यांनीही प्रभागात जोमाने जनसंपर्क सुरू ठेवला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात प्रभावी काम केले. १७५ बेडचे सायबर येथे कोरोना केअर सेंटर उभारले. १७०० रुग्णांवर उपचार केले. शहरासह १२२ गावांमध्ये औषध फवारणी केली. शहरातून १ ट्रक कपडे संकलित करून नक्षली भागातील गोरगरिबांना वाटप केले. त्यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी मतदार करत आहेत. त्यांच्यासह समीर कुलकर्णी, दिनेश पसारे, अभिजित जाधव, अभिजित ऊर्फ बबन मोकाशी, संदीप पोवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
चौकट
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
जयश्री चंद्रकांत जाधव (भाजप) १४४९
सुनीता राजू हुंबे (शिवसेना) १२५६
दीपाली सुरेश ढोणुक्षे (काँग्रेस) १०७३
सुखदा शशांक भाट (राष्ट्रवादी) ५६
चौकट
शिल्लक कामे
मालती अपार्टमेंट ते अजिंक्य तारा मित्रमंडळ रस्त्याची चाळण
पायमल वसाहत रस्ता खराब
सम्राटनगर येथील उद्यानातील खेळणी खराब
काही ठिकाणी पाण्याची समस्या
शिंदे अपार्टमेंट ते मालती अपार्टमेंट येथील नाला वारंवार तुंबून रस्त्यावर सांडपाणी
काही परिसर ड्रेनेजलाइनपासून वंचित
प्रतिक्रिया
पाच वर्षांत सुमारे ५ कोटींचा निधी आणला. मनपाच्या मानधनातून प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, मान्यवरांचा सत्कार केला जातो. ५०० मुलांना मर्दानी खेळाचे प्रशिक्षण आणि फुटबॉल टीमची स्थापना केली. प्रभागात वृक्षारोपण मोहीम राबवली. स्वच्छतेला प्राधान्य दिले असून, वेळच्या वेळी कचरा उठाव करण्यासाठी पाठपुरावा. रस्ते आणि विविध विकासकामांसाठी दीड कोटींचा निधी मंजूर असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
जयश्री जाधव, नगरसेविका
चौकट
पाच वर्षांत झालेली कामे
माने कॉलनी देसाई यांच्या घरासमोर पाण्याच्या टाकीचे काम अंतिम टप्प्यात
चाणक्यनगर, अंबाई डिफेन्स येथील रस्ता
गणपती मंदिर येथील रस्ता
दर गुरुवारी आठवडा बाजार
कोरोनामध्ये ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
प्रभागात नेत्र, आरोग्य शिबिर, चष्मे वाटप
संपूर्ण प्रभागात पाण्याची पाइपलाइन बदलली.
फोटो : १७०२२०२१ कोल केएमसी सम्राटनगर प्रभाग
ओळी : कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक ६३ सम्राटनगरमधील मालती अपार्टमेंट ते अजिंक्यतारा मित्रमंडळ रस्ता खराब झाला आहे.