प्रभाग क्र. ४५ कैलासगडची स्वारी विद्यमान नगरसेवक : संभाजी जाधव
आताचे आरक्षण : सर्वसाधारण महिला
तानाजी पोवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला चांगली मते देणारा तर महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला निकरी झुंज द्यायला लावणारा हा मतदार संघ म्हणजे प्रभाग ४५ कैलासगडची स्वारी होय. हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तयारी केेलेल्या पुरुष उमेदवारांनी आपल्या अर्धांगिणींना निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची जय्यत तयारी केली आहे. प्राथमिक स्थितीत सात इच्छुक चाचपणी करत आहेत.
प्रभागात मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम आणि सुबराव गवळी तालीम अशा दोन वजनदार तालीम मंडळांचा समावेश असल्याने उमेदवारांना निवडून आणण्यासाठी या तालीम संस्थांचा कस लागतो. प्रभागात कॉंग्रेस व शिवसेना या दोन्हीही पक्षांच्या नेत्यांचा नेहमीच ठिय्या आहे. प्रभागाचे विद्यमान नगरसेवक संभाजी जाधव हे जरी भाजपचे असले तरी सध्या ते तन-मनाने कॉंग्रेसमध्येच आहेत. त्यांचे बंधू चंद्रकांत जाधव हे कॉंग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे या प्रभागातील त्यांचीही पाटबळाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. सध्यातरी प्रभागात प्रत्येक जण चाचपणी करत असून, कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांत रस्सीखेच सुरू आहे.
अत्यंत दाट व सामान्य लोकवस्तीचा उंचीवरील हा प्रभाग आहे. त्यामुळे येथे पाण्याच्या अनियमित वेळेची समस्या नेहमीच आ वासून राहिली आहे. गेल्या पाच वर्षात नगरसेवक संभाजी जाधव यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले; पण यंदा त्यांनी आपल्या पत्नीला शेजारील मूळच्या प्रभागात उभे
केले आहे. त्यामुळे कैलासगडची स्वारी प्रभागात ते कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील. कॉंग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रभागात येथे रस्सीखेच दिसते. कॉंग्रेसतर्फे येथे रोहिणी संदीप सरनाईक, मानिनी उमेश पोवार, योगेश्वरी संतोष महाडीक यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन वेळा संभाजी देवणे व एकादा त्यांच्या पत्नी शारदा देवणे यांनी महापालिकेवर प्रतिनिधीत्व केले आहे. त्या कालावधीत त्यांनी उपमहापौर, परिवहन सभापती व महिला-बालकल्याण सभापती ही पदे भूषवित विकास कामे केली. त्या कामाच्या शिदोरीवर शारदा देवणे यांनी पुन्हा निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले असले तरीही १९९५-२००० मध्ये प्रतिनिधीत्व बजावलेल्या माजी नगरसेविका शुभांगी अनिल कोळेकर यांनीही राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी नेत्यांना साकडे घातले आहे. कोळेकर यांनी प्राथमिक शिक्षण मंडळावर सलग पाच वर्षे काम केले आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्या स्नृषा श्वेता अभिषेक देवणे यांनीही रणांगणात उतरण्याची जय्यत तयारी केली आहे. गत निवडणुकीत अभिषेक देवणे यांनी दुसऱ्या स्थानावरील मते घेतली होती. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या माध्यमातून पुन्हा तयारी केली आहे. युवा सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते हर्षल सुर्वे यांच्या पत्नी श्रद्धा सुर्वे याही सेनेची उमेदवारी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रभागात झालेली कामे:
- कोडाळेमुक्त प्रभाग
- घंटागाडी, टिपरमधून रोज कचरा उठाव
- सरकारी शौचालये हटवून घरगुती शौचालय उभारणीस अर्थसहाय्य
- शेळके उद्यान विकासासाठी ५० लाख रुपये खर्च
- आठवड्यातून दोन वेळा औषध फवारणी
- अहिल्याबाई विद्यालय परिसरात पेव्हींग ब्लॉक, कंपाउंड तयार
- रस्ते पेव्हर, डांबरीकरण, काँक्रीट पॅसेज
शिल्लक कामे :
- पाणी अनियमित, कमी दाबाने
- जुनी ड्रेनेज लाइन बदलणे आवश्यक
- अंतर्गत रस्ते
- खुरुगडे घरानजीकच्या सार्वजनिक बंद हॉलची दुर्दशा
- अभ्यासिकेची कमतरता
प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते :
- संभाजी देवणे : २११८
- अभिजीत विजय देवणे : १३९२
- संभाजी देवणे : ७८१
- प्रदीप मराठे : २०८
कोट..
प्रभागातील सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मुख्य रस्ते, काँक्रीट पॅसेज पूर्ण करुन ड्रेनेज लाईन टाकल्या. रोज कचरा उठाव, कोंडाळामुक्त प्रभाग केल्यामुळे प्रभागाला दोन वेळा संत गाडगेबाबा स्वच्छ प्रभागाचा बहुमान मिळाला. महापालिकेच्या मिळणाऱ्या मानधनामध्ये आणखी थोडी गंगाजळी घालून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते.- संभाजी जाधव, विद्यमान नगरसेवक.