शिरोळ : बेशिस्त व बेदरकार गाडी चालवण्याला पायबंद कोण घालणार, असा प्रश्न शिरोळ तालुक्यातून उपस्थित होत आहे. मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतूक नियम व वेग मर्यादेचे पालन न करणे या गोष्टी सर्रासपणे तालुक्यात दिसतात. माती वाहतुकीसाठी तर स्पर्धा लागलेली असते. त्यातच मुरूम व अन्य गौण खनिज यासह अवजड वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. प्रादेशिक परिवहन विभाग अशा वाहतुकीला शिस्त लावणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्यात रस्ते अपघाताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवजड व बेशिस्त वाहतुकीकडे शिरोळसह कुरुंदवाड, जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील वाहतूक पोलिसांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्यामुळेच शिस्त बिघडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शिरोळ तालुका हा सांगली जिल्हा व कर्नाटक सीमाभागाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे कर्नाटक हद्दीतून सर्रासपणे चोरटी वाहतूक होत असते. पहाटेच्या सुमारास ठरावीक दिवशी लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून अर्थ देखील शोधला जातो.
सध्या तालुक्यात माती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सकाळपासूनच माती वाहतुकीसाठी वाहनधारकांत स्पर्धा लागलेली असते. माझ्या वाहतुकीच्या खेपा अधिक की तुझ्या अशी जीवघेणी स्पर्धा रस्त्यावर दिसते. मात्र, भरधावपणे निघालेल्या या वाहनांकडे स्थानिक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ऊस वाहतुकीबरोबर अन्य गौण खनिजाची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा वाहतुकीवर कारवाई कोण करणार, असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
चौकट -
आरटीओ व पोलिसांची अनास्था कारणीभूत
धोकादायक वाहतुकीकडे प्रादेशिक परिवहन व स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यानेच अशी वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. बोकाळलेल्या धोकादायक वाहतुकीत जीव मात्र सर्वसामान्यांना गमवावा लागतो. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागाकडून केवळ पंचनामा केला जातो. या पलीकडे काहीही होत नसल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.
फोटो - १४०२२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ -
शिरोळ तालुक्यात अशाप्रकारे गौण खनिजाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.