विनोद सावंत/ लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीलगत असणारा दुधाळी पॅव्हेलियन प्रभाग क्रमांक ५३ मध्ये महापालिका निवडणुकीत मातब्बरांमध्ये सामना आहे. नागरिकांचा मागासवर्ग महिला प्रभाग झाला असून, सध्याच्या स्थितीमध्ये चार उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेसकडून दोघे इच्छुक आहेत. दोघांनी अद्यापही पक्षाबाबत निर्णय घेतलेला नाही. यामधील टॉवर येथील दोन पारंपरिक विरोधक आमनेसामने आले असून, त्यांच्यामध्ये हाय व्होल्टेज लढत आहे. पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून आहे.
शहरातील संवेदनशील प्रभागापैकी दुधाळी पॅव्हेलियन हा एक प्रभाग आहे. येथील महापालिकेची निवडणूक नेहमी चुरशीने होते. गत निवडणुकीत काँग्रेसचे प्रतापसिंह जाधव, भाजपचे हेमंत कांदेकर यांच्यात अटीतटीचा सामना झाला होता. यामध्ये प्रतापसिंह जाधव यांनी बाजी मारली, तर हेमंत कांदेकर यांचा १७८ मताने पराभव झाला. राष्ट्रवादीच्या विश्वास आयरेकर यांनाही ९५९ मते मिळाली. माजी नगरसेवक सदाशिव बसुगडे यांनी अपक्ष असूनही ५४७ मते घेतली. शिवसेनेचे उदय निगडे यांना २८७ मतांवर समाधान मानावे लागले.
यंदाच्या निवडणुकीमध्ये हा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग महिला झाल्याने अनेकांचा पत्ता कट झाला असून, काहींनी पत्नी, स्नुषाला रिंगणात उतरविले आहे. विद्यमान नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांनी प्रभाग आरक्षित झाल्याने निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. रंकाळा टॉवर येथील प्रवीण लिमकर, हेमंत कांदेकर यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे पारंपरिक विरोधक आमनेसामने आहेत. प्रवीण लिमकर यांनी पत्नी स्वाती लिमकर यांना, तर हेमंत कांदेकर यांनी पत्नी अमिता कांदेकर यांना रिंगणात उतरले आहे.
माजी नगरसेवक दिवंगत उमेश कांदेकर यांच्या वहिनी आणि हेमंत कांदेकर यांच्या पत्नी अमिता कांदेकर यांनीही जोमाने प्रचार सुरू केला आहे. दिवंगत उमेश कांदेकर यांनी २००५ ते २०१० मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षातून महापालिकेत प्रतिनिधित्व केले. हेमंत कांदेकर यांनी उमेश कांदेकर युवा मंचच्या माध्यमातून प्रभागात सामाजिक काम सुरू ठेवले आहे. गत निवडणुकीत ताराराणी आघाडीने अपेक्षित सहकार्य केले नसल्यामुळे कमी मताने पराभूत व्हावे लागल्याने ते भाजप, ताराराणी आघाडीबाबत नाराज आहेत. निवडणूक कोणत्या पक्षातून लढवायची यासंदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरणार आहेत. अमिता कांदेकर याही महिला बचत गटांमार्फत सामाजिक कामात सक्रिय आहेत.
प्रवीण लिमकर रंकाळा मार्केट स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. या कामांच्या जोरावर त्यांनी पत्नी स्वाती लिमकर यांना रिंगणात उतरले आहे. स्वाती यांनी बचत गटांच्या माध्यमातून संपर्क ठेवला आहे. त्या उच्च शिक्षित असून, त्यांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. त्या काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांनी लिमकर यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल ऊर्फ सनी सावंत यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामाच्या जोरावर पत्नी गौरी सावंत यांना रिंगणात उतरविले आहे. पत्नी गौरी सावंत या उच्च शिक्षित असून, एकटी, अवनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय आहेत. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पोलिओ जनजागृतीसाठी स्केटिंग करीत दिल्ली ते कोल्हापूर असे २५०० किलोमीटरचा प्रवास केला. त्याही काँग्रेसकडून इच्छुक आहेत.
केबल व्यावसायिक रवींद्र ऊर्फ लहू सुतार यांनी स्नुषा रिमा पुष्पेंद्र सुतार यांना रिंगणात उतरवले आहे. त्या उच्च शिक्षित आहेत. रवींद्र सुतार यांनी २००० मध्ये महापालिकेची निवडणूक लढविली होती. ते दहा वर्षे वाघाची तालमीच्या कार्यकारिणीवर होते. केबल व्यवसाय असल्याने त्यांचा प्रभागात चांगला संपर्क आहे. रिमा यांचे पती पुष्पेंद्र ऊर्फ किसन सुतार हे वाघाची तालीम फुटबॉल संघाचे खेळाडू आहेत.
प्रतिक्रिया -
पाच वर्षांत सहा कोटींची निधी आणला. जाऊळाचा गणपती, दुधाळी पूल ते उत्तरेश्वर पेठ महादेव मंदिर येथील रस्त्यासाठी वीस लाख रुपये मंजूर आहेत. पानारी वसाहतीमध्ये रस्ते, ड्रेनेज पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुधाळी नाला बांधून ४० वर्षांपासून असणारी समस्या मार्गी लावली. उत्तरेश्वर महादेव मंदिर चौकात व्यासपीठ उभारले.
प्रतापसिंह जाधव, नगरसेवक
चोकट
पाच वर्षांत झालेली कामे
दुधाळी मैदान येथे दोन कोटींच्या निधीतून अद्ययावत शूटिंग रेंज
स्वरूप हॉस्पिटल ते ना. पा. हायस्कूल रस्ता
गोल सर्कल ते हरिओम मंदिर रस्ता
जाऊळाचा गणपती ते गंगावेश रस्ता
पेठे पाटील क्लास ते स्वामी स्वरुपानंद मंदिर शिंगणापूर नाका रस्ता
दुधाळी बॅडमेंटन कोर्ट, व्यायाम शाळा अद्ययावत
चौकट
शिल्लक कामे
दुधाळी पूल ते जाऊळाचा गणपती रस्त्याची दयनीय अवस्था
धुण्याच्या चावी उद्यानात दुरवस्था
पाणारी मळा रस्ते, गटारींच्या प्रतीक्षेत
गवत मंडई स्वच्छतेचा अभाव, शौचालयाची दुरवस्था
दुधाळी पुलाची दुरवस्था झाली असून, नव्याने करण्याची गरज
चौकट
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
प्रतापसिंह जाधव (काँग्रेस) १४९६
हेमंत कांदेकर (भाजप) १३१८
विश्वास आयरेकर (राष्ट्रवादी) ९५९
सदाशिव बसुगडे (अपक्ष) ५४७
उदय निगडे (शिवसेना) २८७
फोटो : २५०२२०२१ कोल केएमसी दुधाळी प्रभाग न्यूज
ओळी : कोल्हापुरातील दुधाळी मैदान येथे दोन कोटींच्या निधीतून अद्ययावत अशी शूटिंग रेंज उभारण्यात आली आहे.