अशोक खाडे- कुंभोज -दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्हाभर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तालुकावार मेळाव्यांबरोबरच मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर सर्व पॅनेलनी जोर दिल्याने संपूर्ण जिल्हा गुरुजींच्या राजकारणाने ढवळून निघाला आहे. तीन एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी संघप्रणीत सत्तारूढ पॅनेल, शिक्षक समिती व पुरोगामी संघटना पुरस्कृत परिवर्तन पॅनेल यांच्यात लढत होणार आहे. काही तालुक्यांत अपक्षांचेही आव्हान निर्माण होण्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सात तालुक्यांत तिरंगी, चार ठिकाणी चौरंगी, तर एका तालुक्यात बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.प्राथमिक शिक्षकांची शिखर बँक समजल्या जाणाऱ्या शिक्षक बँकेत ६८०० शिक्षक मतदार आहेत. पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षक संघ, शिक्षक समिती तसेच पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना पुरस्कृत बँक बचाव पॅनेल दरम्यान तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व जागा जिंकून बँकेची सत्ता अबाधित ठेवली होती.सत्तारूढांनी एकहाती कारभार करीत बँकेत कोअर बँकिंग प्रणाली, एटीएम सुविधा, जागा विक्री तसेच बँकेच्या इमारतीचा लूक बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच गोष्टी कळीच्या बनल्याने या निवडणुकीत सत्तारूढ शिक्षक संघाच्या वरुटे गटाला पायउतार करण्यासाठी विरोधकांनी दंड थोपटल्याने ही निवडणूक तिरंगी होत आहे.बँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे, पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील तसेच संघातील थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील यांच्यात करवीरमधून सर्वसाधारण गटासाठी लक्षवेधी तिरंगी लढत होणार आहे. हातकणंगले शिक्षक बँकेच्या जागा विक्री प्रकरणाच्या मुद्द्यावर निवडणुकीत रंग भरणार असून, येथे विद्यमान संचालक राजमोहन पाटील यांच्याविरोधात परिवर्तन पॅनेलचे अर्जुन पाटील तसेच संघाच्या थोरात गटाचे एन. वाय. पाटील यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. सर्वसाधारण गटासाठी पन्हाळा, भुदरगड, कागल, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यांत तिरंगी लढती होणार आहेत, तर शिरोळ, शाहूवाडी, आजरा, गगनबावडा येथे चौरंगी, तसेच राधानगरीत बहुरंगी लढत होणार आहे.या निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलमधून विद्यमान अध्यक्ष राजाराम वरुटे, संचालक पांडुरंग केणे, राजमोहन पाटील यांना पुन्हा संधी मिळाली आहे, तर बँकेचे माजी उपाध्यक्ष बळवंत पोवार, माजी संचालक रघुनाथ खोत, माजी अध्यक्ष ए. के. पाटील यांच्या पत्नी शोभा पाटील या निवडणूक रिंगणात आहेत.सत्तारूढ गट पाच वर्षांतील कामांच्या जोरावर प्रचारात सक्रिय आहे, तर विरोधकांनी बँकेतील भ्रष्ट कारभाराचा मुद्दा घेऊन प्रचाराचे रान उठविले आहे. तालुका मेळाव्यांबरोबरच सभासदांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर सर्व पॅनेलचा जोर असून, संपूर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक विश्वातील वातावरण निवडणूकमय बनले आहे.करवीरची लढत लक्षवेधीकरवीरमधून विद्यमान अध्यक्ष राजाराम वरुटे, पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, थोरात गटाचे पॅनेलप्रमुख एस. व्ही. पाटील रिंगणात असून, ही लढत जिल्ह्यात लक्षवेधी ठरणार आहे.
गुरुजींच्या राजकारणाचा जिल्हाभर धुरळा
By admin | Published: March 30, 2015 8:37 PM