कवठेमहांकाळ : माझ्यापुढे मोठे राजकीय धर्मसंकट उभे राहिले आहे. तासगाव-कवठेमहांकाळच्या पोटनिवडणुकीत उतरावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, तर पक्षाने जागा न लढविण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मी द्विधा मन:स्थितीत आहे. दोन दिवसात कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील रणनीती ठरविणार आहे. परंतु पक्षाने जो निर्णय घेतला आहे, तो आपण अंतिम आदेश मानू, असे आज माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी आज (गुरुवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. भाजपकडून मागील निवडणूक लढलेले माजी राज्यमंत्री घोरपडे यावेळीही कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणुकीसाठी सज्ज आहेत. निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्व पक्षांना केले आहे. सोमवारी अजितराव घोरपडे व खासदार संजयकाका पाटील यांनी मुंबईत भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या.आज (गुरुवारी) भाजपच्या राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्याविरोधात उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केल्याची चर्चा सुरू झाली. ही बातमी कवठेमहांकाळ तालुक्यात धडकताच घोरपडे यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी घोरपडे यांना, अपक्ष निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे. परंतु घोरपडे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. पक्षादेशानुसार आपण निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचेही घोरपडे यांनी स्पष्ट केले. मात्र येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील राजकीय रणनीती ठरविण्याचेही संकेत त्यांनी यावेळी दिले. या बैठकीसाठी सुनील पाटील, तुकाराम मासाळ, कोंडिबा पाटील, तात्या नलवडे, प्रकाश जगताप, महेश पवार उपस्थित होते. (वार्ताहर)पक्षादेश पाळ्ण्याचे बंधनघोरपडे म्हणाले की, कार्यकर्त्यांचा निवडणूक लढविण्याचा आग्रह असला तरी, आपण काय करायचे याची रणनीती येत्या दोन दिवसात ठरवू, परंतु आपल्याला पक्षाचा आदेश मानावा लागेल, तो मोडून चालणार नाही. पक्षादेशानुसार आपण निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचेही घोरपडे यांनी स्पष्ट केले.
घोरपडे द्विधा मन:स्थितीत
By admin | Published: March 19, 2015 11:03 PM