कोल्हापूर : उमेदवारीसाठी इच्छुकांची झालेली गर्दी, उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांची घेतलेली ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका, शिवसेनेत झालेली बंडखोरी अशा कारणांमुळे व्हीनस कॉर्नर प्रभाग सुरुवातीपासून चर्चेत राहिला. या प्रभागातून ताराराणी आघाडीकडून विद्यमान नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, काँग्रेसकडून आम्रराज देसाई, राष्ट्रवादीकडून अकबर मोमीन, शिवसेनेचे राहुल चव्हाण, अपक्ष म्हणून शशिकांत बिडकर, बहुजन विकास आघाडीद्वारे संतोष दाभाडे तर, शेकापकडून गंगाधर म्हमाणे लढत आहेत. सर्वच उमेदवार तगडे असल्याने ‘काँटे की टक्कर’ रंगणार आहे.बहुतांश सुशिक्षित मतदार असलेला ‘व्हीनस कॉर्नर’ प्रभाग यावेळी सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे इच्छुकांची या ठिकाणी गर्दी झाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-ताराराणी आघाडी, शिवसेना यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, या सर्वच पक्षांनी व्हीनस कॉर्नर प्रभागातील उमेदवाराचे नाव बराच वेळ गुलदस्त्यात ठेवले होते. या प्रभागातून भाजप-ताराराणी आघाडीकडून विद्यमान नगरसेवक प्रकाश नाईकनवरे हे लढत आहेत. शाहूपुरी तालीम हा प्रभाग ‘महिला प्रवर्गा’साठी राखीव झाल्याने तसेच ‘शाहूपुरी तालीम’मधील काही भाग ‘व्हीनस कॉर्नर’मध्ये समाविष्ट झाल्याने त्यांनी लढण्यासाठी या प्रभागाची निवड केली. नगरसेवकपदाच्या कारर्किदीत केलेल्या विकासकामे घेवून ते मतदारांना साद घालत आहेत. काँग्रेसकडून आम्रराज देसाई यांनी तिकीट मिळवून बाजी मारली. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या देसाई हे पक्षाने केलेले काम घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. राष्ट्रवादीने अकबर मोमीन यांना उमेदवारी देऊन आव्हान निर्माण केले. राष्ट्रवादीने शहराच्या विकासात दिलेले योगदान आणि भविष्यातील प्रभागातील विकासकामांची ग्वाही देत त्यांचा प्रचार सुरू आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख शशिकांत बिडकर, राधाकृष्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल चव्हाण आणि अमर समर्थ यांच्यात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी चुरस रंगली होती. सन २००५ मध्ये सुनील मोदी यांच्या विरोधातील लढतीत शशिकांत बिडकर यांचा ३५ ते ४० इतक्या निसटत्या मतांनी पराभव झाला होता. यावेळी बिडकर यांची पक्षाकडील उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, यातच शिवसेनेत प्रवेश करून राहुल चव्हाण यांनी उमेदवारी मिळविली. त्यावर नाराज होत बिडकर यांनी बंडखोरी करून आव्हान दिले आहे. स्थानिक उमेदवार आणि पक्षाने केलेला अन्याय मांडत ते प्रचार करत आहेत. क्षमता पाहून आणि कामाची तयारी लक्षात घेऊनच शिवसेनेने उमेदवारी दिल्याचे सांगत राहुल चव्हाण यांचा प्रचार सुरू आहे. प्रभागात पायाभूत सुविधांबाबतच्या प्रश्न सोडविण्याची ग्वाही आणि कोणतेही पद व सत्तेत नसताना प्रभागात काही ठिकाणी केलेली कामे मांडत ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. बहुजन विकास आघाडीकडून संतोष दाभाडे तर, शेकापकडून गंगाधर म्हमाणे लढत आहेत. पदयात्रा, पत्रकबाजी, कॉर्नरसभा आदींच्या माध्यमातून प्रभागात प्रचाराचे रण पेटविले आहे. (प्रतिनिधी)असे ही साटेलोटेया प्रभागातून लढण्यास अमर समर्थ इच्छुक होते. त्यादृष्टीने त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. समर्थ यांचे नातलग वैष्णवी समर्थ या शाहूपुरी तालीममधून शिवसेनेकडून लढत आहेत. त्यात अमर समर्थ यांनी निवडणूक न लढविण्याचे ठरविले. शिवाय त्यांनी व्हीनस कॉर्नरमधील सेनेचे उमेदवार राहुल चव्हाण यांना मदत करून शाहूपुरी तालीममध्ये नातलग समर्थ यांच्यासाठी चव्हाण यांची मदत घेतली आहे. त्यांच्या अशा पद्धतीने झालेली मदतीच्या साटेलोटेची प्रभागात चर्चा आहे.समाजनिहाय मतदार शहराच्या मध्यवस्तीतील या प्रभागाची मतदारसंख्या ६ हजार १०६ इतकी आहे. त्यात मराठा समाज व२५००, मुस्लिम ९२०, मारवाडी, पटेल, सिंधी १५००, जैन ४३०, सुतार-लोहार ४५० आणि उर्वरित ३०० इतकी आहे.
बहुचर्चित प्रभागात कोणाचे नशीब चमकणार
By admin | Published: October 26, 2015 12:29 AM