कोल्हापूर : ‘ज्याचा माल, त्याची हमाली’ या सूत्रानुसार ट्रकमधून जो माल ज्याच्याकडे उतरला जातो, त्यानेच हमालीचे पैसे द्यावेत, असा महत्त्वपूर्ण आदेश शनिवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. ट्रक वाहतूकदारांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याला यामुळे यश मिळाले आहे. या आदेशाची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रक वाहतूकदारांच्या ‘ज्याचा माल, त्याची हमाली’ या मागणीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी साहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, धान्य व्यापारी असोसिएशनचे प्रदीप कापडिया, पी. जी. मेढे, हमाल पंचायतचे कृष्णा चौगले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीला साखर, सिमेंट व्यावसायिक उपस्थित होते; तर कांदा, बटाटे असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. तसेच ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचा या मागणीला विरोध असल्याने तेही आले नाहीत. मालवाहतुकीसंदर्भातील धान्य व्यापारी वगळता ९५ टक्के घटकांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे यावेळी मान्य केले.