या पदाच्या नेमणुकीबाबत कर्मचारी संघाने यापूर्वी विचारणा केली असता, कुलपतींनी अद्याप विद्यापीठाच्या निवड समितीसाठी सदस्यांचे नाव पाठविले नसल्याचे सांगण्यात आले. त्याला सव्वा वर्षे लोटली आहेत. त्यानंतर पुढील कोणतीही कार्यवाही दिसून आली नाही. कुलसचिव बघ्याची भूमिका घेत आहेत. कुलगुरू हे कुलसचिवांच्या भूमिकेस साथ देत असल्याचे वाटते. कर्मचारी संघ याबाबत योग्य ती भूमिका लवकरच घेणार आहे. या पदाचा प्रभारी कार्यभार नियमाने देणे आवश्यक असताना हा कार्यभार अधिकचा म्हणून देण्यात आला आहे. प्रभारी अधिकाऱ्यास निर्णय, आदेशाबाबतचे अधिकार असतात; पण अधिकचा कार्यभार असलेल्या अधिकाऱ्यांना ते अधिकार नसतात. कुलसचिवांना अधिकचा कार्यभार हा फक्त सहा महिन्यांसाठी देता येतो. विद्यापीठातील अनागोंदी कारभार थांबला पाहिजे. परीक्षा मंडळाच्या संचालकपदी त्वरित नेमणूक करण्यासाठी सदस्यांनी योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मगदूम आणि अध्यक्ष सुनील देसाई यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
‘परीक्षा संचालक’ नेमणूकप्रश्नी अधिकार मंडळे गप्प का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:25 AM