तानाजी पोवारकोल्हापूर : लॉकडाऊनमुळे गेले महिनाभर राज्यातील दारू विक्री पूर्णपणे बंद आहे. दारू मिळत नसल्याने अस्वस्थ तळीरामांनी आता दारू दुकानांना आपले लक्ष्य केले आहे. वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यातील एकही दारू दुकान फोडले नव्हते अगर चोरीचा प्रकार झालेला नव्हता; पण लॉकडाऊननंतर महिन्याभरातच तळीरामांनी तब्बल पाच दुकाने फोडून दारूच्या बाटल्या लंपास केल्याच्या घटना पोलीस दप्तरी नोंद आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत गुन्हेगारांना शोधणे, प्रकरणांचा छडा लावणे, चोरांना पकडणे ही पोलिसांची कामे आता बाजूलाच राहिली. पोलीस यंत्रणा रस्त्यांवर उतरून ‘कोरोना’बाबत प्रबोधन करण्यात व नागरिकांना घरी बसविण्यात व्यस्त आहे. नागरिक घरीच राहिल्याने घरफोड्या बंद झाल्या. लॉकडाऊनमुळे सर्व दुकानांसह दारू दुकाने, बिअर बार पूर्णत: बंद राहिले. सुरुवातीचे काही दिवस ठेवणीतील दारूवर तळीरामांचे दिवस गेले; पण आता दारूच मिळत नसल्याने तळीरामांची अस्वस्थता वाढली आहे.
ज्यांची सकाळ आणि सायंकाळ फक्त दारूनेच होते, त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. दारूची सवय जडल्यामुळे सायंकाळ झाली की दारूविना अनेकांचे हात थरथरतात. त्यामुळे अनेकांचे हात आता दारूची दुकाने फोडण्याकडे वळले. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकही दारूचे दुकान फोडल्याची घटना पोलिसांत नोंद नाही; पण ‘लॉकडाऊन’च्या एका महिन्यातच कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर वाकरे (खुपिरे), वळिवडे (गांधीनगर), आर. के.नगर, हातकणंगले, चंदगड अशी तब्बल पाच ठिकाणी दुकाने फोडून दारू चोरीच्या नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.----------तिप्पट दराने चोरून विक्रीमहिनाभर दारू विक्री बंद असल्याने तळीराम हे मिळेल त्या दराने दारू विकत घेऊन आपली नशा भागवत आहेत. त्यामुळे चोरट्या दारू विक्रीचे दर हे दुप्पट, तिप्पट झाले आहेत. ते खिशाला परवडणारे नसले तरी सवयीपुढे मिळेल त्या किमतीला दारू उपलब्ध केली जात आहे.इतर बंद दुकाने सुरक्षितलॉकडाऊनच्या कालावधीत इतर व्यावसायिकांचीही दुकाने गेले महिनाभर बंद आहेत. त्या दुकानांतही लाखो रुपयांचा माल असूनही ती सुरक्षित आहेत. फक्त दारूची दुकाने फोडल्याच्या घटना एकापाठोपाठ घडत आहेत.