प्रकाश पाटील कोपार्डे - कुंभी कासारी साखर कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवून उच्चांकी एफआरपी देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. पण कारखान्याच्या दारातून इतर कारखान्यांने गाळपासाठी ऊस वाहतूक करीत असताना स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्ये गप्प का असा उद्विग्न सवाल कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांनी स्वाभिमानीच्या आंदोलक कार्यकर्त्यांना केला. आम्ही फक्त पगार घ्यायचा का, संस्थेचे हिताचे निर्णय घेऊ का नको असे म्हणताच आंदोलकांना काही वेळ काय बोलावे हे सुचेना... आज कुंभी कारखान्याने ऊस तोडण्या दिल्याचे समजताच स्वाभिमानीचे कार्यकर्ते कारखाना स्थळावरील शाहू महाराजांच्या पुतळ्या जवळ एकत्र झाले. यावेळी कामगार व ऊस वहातूकदारांची संघटनेच्या कार्यकर्त्याबरोबर बाचाबाची झाली.
आज कुंभी कासारी साखर कारखान्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाबाबत पाठिंबा देत ऊस तोडणी दिली नव्हती.आज १५ दिवस इतर कारखान्यांकडून कारखान्याच्या शेजारील ऊस वहातूक सुरू असल्याने प्रशासनाने ऊसतोडणी देण्याचा निर्णय घेतल्याने संघटनेचे बाजीराव देवाळकर,रंगराव पाटील,बाबासाहेब पलसकर (कोपार्डे)पांडुरंग शिंदे,पांडुरंग केंबळेकर(खुपीरे) सुनील कापडे,भिवा पाटील(सांगरूळ) व संघटनेचे कार्यकर्ते एकत्र झाले. हे समजताच शेती विभागाचे कर्मचारी व ऊसवहातूकदार यांनी कुंभी कारखान्याच्या ऊसतोडणी सुरू झाल्या म्हणून तुम्ही येथे आला आहात तसे येथून इतर कारखाने ऊस वहातूक करत आहेत त्यांची वहाने का आडवली जात नाहीत.यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली.
संघटनेच्यावतीने ऊसदराचा निर्णय होईपर्यंत ऊसतोडणी थांबवा हे निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांच्याकडे गेले. यावेळी पांडुरंग शिंदे यांनी ऊस तोडणी थांबवा मागील हंगामातील ४०० रुपये व या हंगामात ऊसदराची घोषणा झाल्या शिवाय तोडण्या देऊ नका असे सांगितले.बाजीराव देवकर म्हणाले येत्या दोन दिवसात ऊस दराचा निर्णय होईल. आतापर्यंत ऊसतोड थांबून संघटनेच्या आव्हानाला सहकार्य केले आहे. ऊस तोडणी देऊन संघर्ष नको असे सांगितले.
यावेळी कुंभीचे कार्यकारी संचालक धीरज कुमार माने म्हणाले तुम्हीच सांगा आम्ही किती दिवस कारखाना बंद ठेवायचा? कारखान्याच्या गेटवरून इतर कारखाने ऊस वाहतूक करत असताना त्यांच्या तोडण्या थांबवल्या जात नाहीत.अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी यावर्षीची उच्चांकी 3200 एफआरपी जाहीर केली आहे. मागील हंगामातील सर्व एफआरपी, सवलतीची साखर ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कुंभीच प्रशासन काम करते. कारखान्याच्या जवळचा ऊस इतर कारखाने पळवा पळवी करत असताना आम्ही बघत बसायचे का? आम्ही केवळ पगार घेत राहायचे का? कारखान्याच्या हितासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावे.ऊस तोडणी व वाहतुकीला मज्जाव करू नका. शेतकरी हंगाम सुरू करण्यासाठी आमच्याकडे विचारणा करत आहेत. आम्ही त्यांना काय उत्तर देऊ गेली पंधरा दिवस उसाची एक मोळी ही गाळप केलेली नाही कामगारांचे पगार इतर खर्च प्रशासनाला पेलवणारा नाही कृपा करून शेतकऱ्यांना व वाहतूकदारांना धमक्या देऊ नका असे उद्दीग्न होऊन सांगितल्यानंतर काही काळ संघटनेचे कार्यकर्ते ही शांत झाले.यावेळी संचालक विलास पाटील यांनीही संघटनेला सहकार्य करण्याची विनंती केली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.