कोल्हापूर : ‘चार भिंतींतील पक्ष’ अशी कोल्हापुरातील भाजपची ओळख पुसून पक्षाला व्यापक स्वरूप देण्याचा २० वर्षे प्रामाणिकपणे प्रयत्न केला. घरादाराचा विचार न करता पक्षवाढीसाठी झटलो, तरीदेखील विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण मतदारसंघातून माझी उमेदवारी का जाहीर होत नाही? हे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करावे, असा सवाल भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी आज, गुरुवारी येथे केला.कळंबा (ता. करवीर) येथील अमृतसिद्धी हॉलमध्ये झालेल्या भाजप व हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जाधव म्हणाले, पक्षाकडून आतापर्यंत कोल्हापूर दुर्लक्षितच राहिले आहे. चार भिंतींतील पक्ष अशी कोल्हापुरात असलेली भाजपची ओळख पुसण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे करताना माझ्या घरादाराचा, कुटुंबीयांचाही विचार केला नाही. या कामाच्या जोरावरच भाजपचा सलग तीन वेळा जिल्हाध्यक्ष झालो. तिसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर घेतलेल्या मेळाव्यातील गर्दी पाहून आमदार चंद्रकांत पाटील यांनी मला तूच पक्षाकडून ‘दक्षिण’चा उमेदवार असल्याचे सांगितले होते. तरीही ‘दक्षिण’साठी भाजपमधून इच्छुकांची यादी वाढत आहे. त्यावर प्रामाणिकपणे पक्षाचे काम करूनही ‘दक्षिण’मधील माझी उमेदवारी जाहीर का होत नाही? हे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावे. सुरेश जरग, नाना जरग, संभाजी साळोखे, अशोक देसाई, मधुमती पावनगडकर, दीपक मगदूम, नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी भाषणातून महेश जाधव यांनाच उमेदवारी मिळावे, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)धनशक्तीविरोधात जनशक्तीगृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन खात्याचे काम असले, तरी त्यांच्या कालावधीत कोल्हापुरात सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. राजरोस गुटखा विक्री होत असल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला. ते म्हणाले, मंत्री पाटील हे दक्षिण मतदारसंघात कोट्यवधींची कामे केल्याचे सांगतात. ही कामे झाली असतील, तर अजून पाचगाव व फुलेवाडीचा पाणीप्रश्न का सुटला नाही? टोल व हद्दवाढीबाबतची त्यांची भूमिका जनता अजून विसरलेली नाही. त्यामुळे ‘दक्षिण’मधील धनशक्तीच्या विरोधातील जनशक्तीच्या लढ्याला निश्चित बळ मिळेल, याची मला खात्री आहे.
भाजपचे प्रामाणिकपणे काम करूनही उमेदवारी का नाही?
By admin | Published: September 11, 2014 10:43 PM